नंदूरबार l प्रतिनीधी
किरकोळ कारणावरुन पत्नीचा जीव घेणा-या पतीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व 10 हजारांचा दंड ठोठावला आहे.
नवापूर पोलीस ठाण्याचे हद्दीतील पाचंबा परिसरात राहणा-या फिर्यादी वनिता नितेश वळवी यांचे सासरे सोनारसिंग वळवी हे नेहमी फिर्यादी यांची सासू राधा वळवी हीच्यासोबत किरकोळ कारणावरुन भांडण करुन त्यांना मारहाण करीत असे. 30 जून 2023 रोजी रात्रीचे वेळेस फिर्यादी व त्यांचे मुले दिराणी असे घरात झोपले असतांना त्यांना त्यांच्या घराच्या बाजुला राहत असलेल्या सासू राधा वळवी यांचा ओरडण्याचा आवाज येत असल्याने फिर्यादी व दिराणी असे सासू सासरे यांचे घरात जाऊन पाहता सासरे सोनारसिंग वळवी हे सासू यांना मारहाण करीत होते त्यावेळी तेथे उपस्थित लोकांनी भांडण सोडविले,
परंतु सासरे सोनारसिंग वळवी पुन्हा सासू राधा वळवी हीस शिवीगाळ करीत जबर मारहाण करु लागले सदर वेळी फिर्यादी व शेजारी राहणारे यांनी जाऊन पाहीले असता सासरे सोनारसिंग यांनी घराचा दरवाजा आतून लावुन घेतला व सासु राधा वळवी हीस मारहाण करीत होते. सदर दरवाजा उघडण्यासाठी फिर्यादी व नातेवाईक यांनी आवाज देऊन दरवाजा उघडण्यास सांगितले परंतु फिर्यादी यांचे सास-याने दरवाजा उघडला नाही व काही वेळानंतर सासू राधा वळवी यांचा ओरडण्याचा आवाज देखील बंद झाला होता.
त्यामुळे फिर्यादी यांना वाटले की सासू सासरे यांचे भांडण मिटले असावे असे समजून फिर्यादी व इतर लोक आपआपले घरी जाऊन झोपून गेले. त्यानंतर 1 जुलै 2023 रोजी सकाळचे सुमारास फिर्यादी यांचे सासरे सोनारसिंग वळवी हे जवळच राहणारे दिपक पाडवी यांचे घरी जावून त्यांना माझी पत्नी उठत नसून हालचाल करीत नाही बाबत सांगु लागले, दिपक पाडवी यांनी सदर बाबत फिर्यादी यांचे घरी जावून कळविले, फिर्यादी व दिराणी अशांनी लागलीच सासू यांचे घरात जावून पाहीले असता सासू राधा वळवी हया हालचाल करत नव्हत्या, त्यांचे अंगावर ठिकठिकाणी जखमा दिसून आल्याने त्यांनी लागलीच पोलीस पाटील यांना कळवून नवापूर पोलीसांना सदर बाबत माहिती दिली.
नवापूर पोलीसांनी सदर ठिकाणी फिर्यादी यांची सासू राधा वळवी यांना सरकारी दवाखान्यात रवाना केले, सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी फिर्यादी यांची सासु राधा वळवी यांना मयत घोषित केले होते. त्याअन्वये नवापूर पोलीस ठाणे गु.र.नं. 328/2023 भा.द. वि. कलम 302, 504 प्रमाणे 1 जुलै 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी सदरचा गुन्हयाचा तपास पोउपनि मनोज पाटील यांच्याकडे दिला.
पोउपनि मनोज पाटील व त्यांचे सहकारी पोलीस यांनी आरोपीस तात्काळ अटक करुन सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी याचे विरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश, के. पी. नांदेडकर यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश, के.पी. नांदेडकर, नंदुरबार यांनी आरोपीतास भा.द.वि.क.-302 अन्वये दोषी ठरवल जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. व्ही.सी. चव्हाण यांनी पाहिले असून पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि सागर नांद्रे, पैरवी अंमलदार पोहेकों नितीन साबळे व पोना गिरीष पाटील यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.