नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या “कौन बनेगा करोडपती” या लोकप्रिय कार्यक्रमात शहादा तालुक्यातील वडाळी येथील संतोषगीर कृष्णागिरी बावा (गोसावी) यांना स्पर्धक म्हणून संधी लाभली आहे. खान्देशातून प्रथमच बिग बी अमिताभ बच्चन समोर “हॉट सीटवर” विराजमान होणारे संतोषगिरी बावा हे पहिले स्पर्धक असून, संपूर्ण नंदुरबार जिल्हा वासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे.सोनी टी.व्ही.वर सोमवार दि.७ रोजी रात्री नऊ वाजता प्रसारित होणाऱ्या केबीसीच्या भागात ते दिसणार आहेत.
हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांची प्रत्यक्षात एक झलक बघायला मिळावी म्हणून त्यांच्या बंगल्यासमोर देशातील त्यांचे लाखो चाहते तासनतास वाट पाहत उभे राहतात. परंतु त्याचं महानायका समोर “हॉट सीट”वर बसून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी लाभणे हे विशेषचं! मात्र ही सुवर्णसंधी चक्क खांदेशातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या वडाळी सारख्या खेडेगावातील युवकाला लाभली आहे. वडाळी येथील संतोषगिर कृष्णागिरी बावा (गोसावी) यांनी प्रबळ इच्छाशक्ती, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर ही मजल गाठली आहे. येत्या सोमवारी रात्री नऊ वाजता सोनी टीव्हीवरील “कौन बनेगा करोडपती” कार्यक्रमात ते आपल्याला महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहेत.दरम्यान अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत, त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील डायलॉग आपण बोलून दाखविल्याने “बिग बी” खुष झाले व आपले कौतुक केले हा माझा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता ,असे संतोषगिर बावा यांनी सांगितले.
संतोषगिर गोसावी हे सध्या मराठा विद्या प्रसारक समाज मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय अवसरी ता. इगतपूर येथील शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.तसेच वडाळीचे पोलीस पाटील गजेंद्रगिर गोसावी व तुषार गोसावी , विवेक गोसावी यांचे भाऊ आहेत.
२२ वर्षांच्या परिश्रमाचे चीज झाले
लहानपणापासूनच अमिताभ बच्चन यांचे प्रचंड वेड होते. शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतावर गाई,शेळ्या राखतांना त्यांचे चित्रपट बघून डायलॉग बोलायचो. त्याचवेळी “बिग बी”ची भेट व्हावी, असं सारखं वाटायचं पण आपल्यासारख्या खेड्यातल्या मुलाला हे कसे शक्य होणार! मात्र केबीसीच्या माध्यमातून “हॉट सीट”वर गेलो तर नक्कीच आपल्याला ते भेटतील हा आत्मविश्वास होता. यासाठी गेल्या २२ वर्षांपासून अविरत प्रयत्न सुरू होते.