शहादा l प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे नंदुरबार जिल्हा संघटक तथा विविध सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले प्रा. डी.सी. पाटील यांची नंदुरबार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ग्राहकांच्या हितासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद कार्यरत आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी म्हणून प्रा. डी. सी. पाटील यांची निवड जाहीर केली आहे. प्रा. पाटील यांनी या अगोदर शिक्षकांसाठी असलेल्या राज्य शासनाच्या शालार्थ समितीचे अशासकीय सदस्य म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.
तसेच त्यांनी नंदुरबार जिल्हा शैक्षणिक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष व नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे जिल्हा अध्यक्षपदाच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविल्या आहेत. त्यांच्याच अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत तत्कालीन शिक्षणाधिकारी घनश्याम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन दरमहा 5 तारखेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शहादा तालुका पत्रकार संघाचे दोन वेळा तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. प्रा. पाटील यांच्या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षिक, राजकीय क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.