नंदुरबार l प्रतिनिधी
हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लाल की…’ असा जयघोष, श्रीकृष्ण-राधा यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा, दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपाळांकडून लावले जाणारे थर… अशा उत्साहाच्या वातावरणात द फ्युचर स्टेप स्कूल भालेर येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित, द फ्युचर स्टेप स्कूल भालेर येथे श्री कृष्ण जयंती उत्सव साजरा करण्यात आला. य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका सौ.कविताताई पाटील ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पूजन व दही हंडी पूजन करून करण्यात आली. सौ. शैला गिरासे यांनी विद्यार्थ्यांना श्री कृष्ण जयंती का साजरी करतात याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला. ‘गोविंदा आला रे आला……’ या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला. शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने दोन थर लावत दहीहंडी फोडताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. याप्रसंगी राधा कृष्णाची वेशभूषा करून शाळेतील विद्यार्थी दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. शाळेत बांधण्यात आलेली दहीहंडी श्रीकृष्ण रूपातील बालकांच्या मदतीने फोडली. या कार्यक्रमात नर्सरी ते पहिली पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.