नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेतील 2 लाख 70 हजार 099 पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गौरी- गणपती उत्सवानिमित्त शासनाकडून 100 रुपयांत 4 शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा”वाटप करावयाचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिली आहे.
शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्या- व्यतिरिक्त गौरी-गणपती उत्सवानध्ये पात्र शिधापत्रिकाधारकांना पुन्हा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन खादयतेल(900-910 ग्रॅम) या 4 शिधाजिन्नस संच मिळणार आहे. सध्या किराणा महागला असताना गोरगरीब कुटूंबियींसाठी आनंदाचा शिधा आधार ठरणार आहे.
गौरी-गणपतीच्या दिवसांत जिल्ह्यातील पात्र रेशन कार्डधारकांना 100 रुपयांमध्ये “आनंदाचा शिधा” रेशन दुकानांमध्ये मिळणार आहे. सणासुदीच्या दिवसांत खाद्यतेल, डाळी, साखरेचे भाव वाढल्याने सर्वसामान्य कुटूंबांसमोर प्रश्न उभा राहतो. आता मंत्रिमंडळ निर्णयानंतर शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचा लाभ होणार आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून वाटप सुरु असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली.
यांना मिळणार आनंदाचा शिधा
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेतील पात्र कार्डधारकांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे. आनंदाचा शिधा वाटपासाठी लवकरच जिल्हयात धान्याचा पुरवठा होणार आहे.
100 रुपयांत मिळणार या शिधाजिन्नस
पुरवठा विभागाकडून मिळणाऱ्या या आनंदाच्या शिधामध्ये 100 रुपयांत रेशनकार्डधारकांना एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर सोयाबिन खाद्यतेल (900-910 ग्रॅम) मिळणार आहे. हे साहित्य खुल्याबाजारात किमान 250 ते 300 रुपयांचे आहे.
वाटपाचा कालावधी
गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करावयाचा संच 15 ऑगस्ट, 2024 पासुन ते 15 सप्टेंबर, 2024 या एक महिन्याच्या कालावधीत वितरित केला जाईल.
तालुकानिहाय लाभार्थी
* नंदुरबार 595042
* नवापूर 485013
* शहादा 680554
* तळोदा275155
* अक्कलकुवा 398506
* अक्राणी 26674
* एकूण 270099
या प्रमाणे प्रमाणे पुरवठा विभागाने मागणी नोंदविलेली आहे. जिल्ह्यातील 2 लाख 70 हजार 099 पात्र कुटूंबाना आनंदा शिधा वाटपाचा पुरवठादारांकडून संबंधित तालुका गोदामात पुरवठा होताच रेशन दुकानदारांमार्फत पात्र लाभार्थ्यांना मिळेल.
गौरी-गणपती उत्सवानिमित्त जिल्ह्यातील अंत्योदय योजना व प्राधान्य कुटूंब योजनेतील पात्र कार्डधारक
लाभार्थीं यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानातुन “आनंदाचा शिधा” संच प्राप्त करुन घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी केले आहे.