नंदुरबार l प्रतिनिधी
जल जीवन मिशन योजनेच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्याआहेत. योजनेतील कामांची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाईच नाही तर त्याला शिक्षा करण्यातील येईल असा गंभीर इशारा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. यावेळी उपस्थित नंदुरबार व शहादा तालुक्यातील सरपंचांनी जल जीवन मिशन योजनेच्या तक्रारींच्या पाऊस पाडला.
नंदुरबार येथील शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयास ना. पाटील यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते. नंदुरबार जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या तक्रारींची चौकशी सुरू असून, योजनेत जे-जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.
महाविकास आघाडीवर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला. ते म्हणाले,योजना राबवणारे महायुती सरकार आहे. पैसे खाणाऱ्यांचे हे सरकार नाही. सरकारकडून योजनांवर योजना राबविण्यात येत असल्यामुळेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधक अपप्रचार करीत आहेत. महिलांनी देखील अपप्रचारांना बळी पडू नये. या योजनेच्या लाभ लवकरच महिलांना होणार आहे. अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, पं.स सभापती अंजना वसावे,शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील,पं.स उपसभापती संतोष साबळे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,जि.प सदस्य देवमन पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रमसिंह वळवी, किशोर पाटील, मधुकर पाटील, पं.स माजी सभापती तेजस पवार,प्रल्हाद राठोड, युवा सेनेच्या महिला जिल्हाप्रमुख राजश्री मराठे, महिला महानगर प्रमुख माळी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नंदुरबार जिल्हा परिषदेत जलजीवन मिशन योजनेत भ्रष्टाचाराचं कुरण झालेलं आहे. योजनेत केंद्र सरकारची एजन्सी नेमली होती त्यांनी घरी बसूनच चुकीचे आराखडे बनवण्यात आले. पाच ते दहा हजाराच्या लोकसंख्येच्या गावाला कमी क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बनवण्यात आल्या. योजना करण्यासाठी गावा गावातील रस्ते खोदून टाकलेले आहेत. खोदलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत.