नंदुरबार l प्रतिनिधी-
शहरातील नळवा रोड परिसरातील सिटी पार्क मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या दिंडी मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक.
सिटी पार्क मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात
विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात
नंदुरबार- येथील नळवा रोड परिसरातील सिटी पार्क मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. काकड आरती, पालखी दिंडी, महाआरती व महाप्रसाद यांचा समावेश होता. यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा सुमारे दीड हजार भाविकांनी लाभ घेतला.
नंदुरबार शहरातील नळवा रोड परिसरातील सिटी पार्क मध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथील भजनी मंडळातर्फे विविध भजने सादर करण्यात आली. पहाटे साडेपाच वाजता ग्रामसेवक हरीश खसावद यांच्या हस्ते काकड आरती करण्यात आली. सहा ते आठ दरम्यान मंदार चंद्रात्रे महाराज यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
सकाळी आठ वाजता पोलीस निरीक्षक श्री. पालवे, मोरसिंग नायक, मंदार चंद्रात्रे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून विठ्ठल रुक्मिणी यांच्या पादुकांची सिटी पार्क परिसरातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढण्यात आली. यात महिल भाविकांतर्फे फुगडी नृत्य, गरबा नृत्य, कानबाई नृत्य करण्यात आले. दिंडी जात असलेल्या मार्गावरील रहिवाशांनी दिंडीचे विधिवत पूजन करून मार्गस्थ केली. या दिंडीचा समारोप दुपारी साडेबारा वाजता करण्यात आला.
सायंकाळी सात वाजता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर महिला मंडळांनी विविध भजने सादर केली. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा सिटी पार्क, तिरुपती नगर, संयम पार्क, मोडक नगर, शाहूनगर, एकता नगरासह शहरातील दीड हजार भाविकांना लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिटी पार्क परिसरातील मंदिर समितीचे पदाधिकारी व रहिवाशांनी परिश्रम घेतले