नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीच्या घटना, वाहतुक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेबाबत दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.
पोलिस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांना प्रा.मकरंद पाटील यांनी दिलेल्या लेखी पत्राचा आशय असा,शहादा शहर व पोलीस स्टेशनच्या हद्दीत गत काही दिवसांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. याबाबत सर्वसामान्य जनतेकडून नाराजी व्यक्त केली जात असून या घटनांना पायबंद घालावा यासाठी जनप्रतिनिधी म्हणून आपणास पत्र लिहित आहे.शहादा शहरातील खाजगी तसेच शासकीय मालमत्तेची चोरी करून काही जण भंगार विक्रेत्यांकडे वस्तू विक्री करतात.
आपण याची दखल घेऊन चोरीच्या वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा शोध घेऊन कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेत शिवारातील इलेक्ट्रिक मोटारी, शेती पूरक साहित्य तसेच शेतमालाच्या चोरीच्या घटना घडत आहेत. याबाबत तक्रार दाखल करूनही चौकशी होत नसल्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत शहरातील वाहतुक व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. एकेरी मार्गाचा अवलंब न करणे,नो पार्किंग झोनमध्ये वाहन उभे करणे, अवजड वाहने मेनरोडवरून नेणे, व्यावसायिक लॉरीधारकांचे मुख्य रस्ते व चौकातील अतिक्रमण, जुनी तहसिल कचेरी ते भाजी मंडई पर्यंतच्या फुटपाथवरील अतिक्रमण इत्यादींबाबत दखल घेऊन वाहतुकीचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था व्हावी.चोरीच्या घटना, वाहतुकीची कोंडी, अवैध व्यवसाय यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असून शहरातील सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात येऊन जनहितासाठी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रा.पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली असून तहसीलदार शहादा यांना पत्राची प्रत पाठवली आहे.