नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरत येथे झालेल्या खूनासंदर्भातील दाखल खटल्यात मयतांच्या नातेवाईकांसोबत तडजोड करुन देण्याा नकार दिल्याने वाहन थांबवून चाकू व काठीने हल्ला करीत जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघा संशयितांविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात सलमान खान पठाण व शाहरुख खान पठाण असे दोघे भाऊ जखमी झाले आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सलमान खान फिरोजखान पठाण यांचा मावसभाऊ याचा सन २०२१ मध्ये संशयित फारुख उर्फ छोटा पार्सल असलम शाह फकीर (वय २७, रा.मिठीखाडी लिंबायत सुरत) याने सुरत येथे खून केल्याने त्यासंदर्भात दाखल खटला मागे घ्यावा यासाठी सलमान खान पठाण यांच्या भावाने मयताच्या नातेवाईकांशी तडजोड करण्यास नकार दिला. याचा राग मनात फारुखच्या मनात होता. दि.१८ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास सलमान खान फिरोज खान पठाण व शाहरुख खान फिरोज खान पठाण (वय ३०, रा.लिंबायतत, सुरत) व इतर दोघेजण सुरत येथून पारोळाकडे लग्नासाठी जात होते.
यावेळी वावद गावाच्यापुढे सलमान खान पठाण यांच्या ओळखीचे फारुख व शाबीर शहा तसेच त्यांच्यासोबतच्या इतर दोघांनी सलमान खान यांच्या वाहनाच्या पुढे त्यांचे वाहन उभे केलेे. यामुळे सलमान खान यांनी वाहन थांबविले. वाहन थांबल्यानंतर फारुख उर्फ छोटा पार्सल असलम शाह फकीर, शाबीर शाह व त्यांचे दोन साथीदार अशा चौघांनी मृत्यूच्या खटल्यात तडजोड करुन आणण्यासाठी वाद घातला. मात्र यास नकार दिल्याने रागाच्या भरात चाकूने व काठीने हल्ला केला. यात सलमान खान पठाण व शाहरुख खान पठाण असे दोघे भाऊ जखमी झाले.
तसेच वाहनांच्या काचा व लाईट फोडून देखील संशयितांनी नुकसान केले. याबाबत नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात सलमान खान पठाण यांच्या फिर्यादीवरुन संशयित चौघांविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७, ३४१, ३२४, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत.