नंदुरबार l प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंदुरबार येथील दौरा निश्चित झाला असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ दिनांक 10 मे 2024 रोजी नंदुरबार शहरात मोदी यांची भव्य जाहीर सभा होईल, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः आज दुपारी नंदुरबार येथे दिली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ.हिना विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रश्खेर बावनकुळे हे आज 2 मे 2024 रोजी नंदुरबार जिल्हयात आले असता त्यांच्या उपस्थीतीत नंदुरबार लोकसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कामकाजी बैठक पार पडली. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद करताना त्यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही नंदुरबार येथील चौथी जाहीर सभा असेल. तर भाजपाचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यासाठी होणारी ही त्यांची तिसरी जाहीर सभा असेल.
सभेची जय्यत तयारी सुरु: मंत्री डॉ. गावित
दरम्यान, याविषयी सविस्तर माहिती देताना महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिनांक 10 मे 2024 रोजीचा दौरा निश्चित झाला असून त्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे.
या दिवशी सकाळी साडेदहा वाजता सभा होईल. त्यासाठीच प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका पार पडणे जबाबदारी चे वाटप करणे सुरू झाले आहे. मागील वेळी पार पडली होती त्याच ठिकाणी नंदुरबार शहरा लगतच्या धुळे रोडवरील मैदानावर ही सभा पार पडेल आणि मागच्या वेळेस पेक्षा रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती राहील असा विश्वास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.
दरम्यान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज बाबा रिसॉर्ट येथे पार पडलेल्या बैठकीला आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी, खा.डॉ.हिनाताई गावित, जिल्हा परीषद अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित, आ.राजेश पाडवी, आ.काशीराम पावरा, भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, लोकसभा प्रभारी तुषार भाऊ रंधे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, तालुका अध्यक्ष जे. एन. पाटील यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते. या बैठकीत मोजक्याच पदाधिकाऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले होते.