नंदुरबार l प्रतिनिधी
लोकांचा विकास कसा करता येऊ शकतो, याचे नियोजन करण्याची आणि अंमलबजावणीची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षातच आहे. केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यास विकासाला दुप्पट चालना मिळू शकेल, असे सांगतांनाच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अमरीश भाई पटेल यांनी “ताई आता चिंता करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही निवडून येणारच” अशा ठाम शब्दात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांना भरभक्कम विश्वास दिला.
नंदुरबार लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी 20 एप्रिलला सुळे येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. सध्या खासदार डॉक्टर हिना गावित यांचे शिरपूर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका मिळावे आणि कॉर्नर सभा घेणे सुरू आहे.
अमरीश भाई आपल्या भाषणात याप्रसंगी म्हणाले की, हाती कोणताही मुद्दा नाही म्हणून तद्दन खोटा प्रचार विरोधकांनी चालवला आहे परंतु लोकांनी आता भाजपा विरोधी खोटे बोलणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये. माझ्यासह खासदार डॉ.हीना गावित, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, आमदार कांशीराम पावरा यांनी शिरपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. ती कायम राहावीत, समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत फायदा पोहचवायचा असेल तर भाजपच्या उमेदवार डॉ.हीना गावित यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री, आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले.
भाजपा आणि गावित परिवाराच्या विरोधात बोलणाऱ्यांवर प्रहार करताना खासदार डॉक्टर हिनाताई गावित म्हणाल्या, काँग्रेस वाल्यांना भाजप सरकारविरोधात मुद्देच नसल्यामुळे त्यांच्याकडून भजपा संविधान विरोधी असल्याचा अपप्रचार केला जात आहे. परंतु मोदींची गॅरंटी आहे की, भाजपच्या काळात संविधान पूर्णतः सुरक्षित होते, आहे आणि राहील; असेही प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांनी केले.
या प्रचार दौऱ्यात शिरपूरचे आमदार कांशीराम पावरा, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विधानसभा निवडणूक प्रमुख के. डी. पाटील, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, भाजपचे सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा, सरलाबाई पावरा, आरती पावरा, सुशिलाबाई पावरा, अनिता पावरा, रतन पावरा, नारायण पाक्रा आदी उपस्थित होते.