नंदुरबार l प्रतिनिधी
अवकाळी पावसामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सांत्वन करण्यासाठी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी आज सकाळी तातडीने शहादा तालुक्यातील हिंगणी, सारंगखेडा, वडाळी, बामखेडा, तोरखेडा, जयनगर व प्रकाशा परिसरात तातडीचा पाहणी दौरा केला. नुकसानग्रस्तांची भेट घेत व अधिकाऱ्यांना सूचना करीत दिलासा दिला.
अधिक वृत्त असे की, शहादा तालुक्यातील हिंगणी, सारंगखेडा, वडाळी, बामखेडा, तोरखेडा, जयनगर व प्रकाशा यांसह काही गावांना दि. 12 मार्च 2024 रोजी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. सारंगखेडा व परिसरात कलिंगड, खरबूज, डांगरमळे उध्वस्त झाले. केळी, पपई, हरभरा, केळी पिकांचे अतोनात नुकसान झाले. ज्वारी काढण्यावर आली असताना, हे घडले. त्यामुळे शैतकरी चांगलाच हादरला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील तीन महिन्यात दुसऱ्यांदा शेतकऱ्याच्या अगदी हाता तोंडाशी आलेला घास जाण्याचा प्रसंग घडल्यामुळे शेतकरी कोलमडलेल्या अवस्थेत आले आहेत.
दरम्यान शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटाची दखल दखल घेत महायुतीच्या उमेदवार तथा भारतीय जनता पार्टीच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी तातडीने अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या गावांना भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. उध्वस्त झालेल्या केळी बागा पपईची झालेली नासधूस आणि इतर शेत पिकांचे झालेले नुकसान पाहताना खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी मन व्यथित झाल्याचे सांगितले.
या भागातील शेतकऱ्यांना अवघ्या काही दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचे संकट झेलावे लागत आहे आणि त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे याविषयी शासकीय स्तरावरून मदत मिळवून देण्याचे प्रयत्न निश्चितपणे केले जातील असे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्वस्त केले. त्याचबरोबर वीज पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
फेस तालुका शहादा येथील आपल्या शेतात काम करीत असताना अनिल ओंकार पाटील या शेतकऱ्यावर वीज पडून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वृद्ध आई-वडील यांना भेटून सांत्वन केले तसेच धुळे येथील खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर यांच्याशी तब्येतीविषयी चर्चा करून वरिष्ठ पातळीवर संपर्क करण्याच्या सूचना खासदार संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी केल्या.