नंदुरबार l प्रतिनिधी
महायुतीच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा.डॉ. हिना गावित यांच्या प्रचाराच्या उद्देशाने लोणखेडा तालुका शहादा येथे पार पडलेल्या बैठकीला मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला. शहादा तालुक्यातील भाजप आणि मित्र पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गावातील सरपंच उपसरपंच कार्यकर्ते आणि विविध सेवाभावी व सहकारी संस्थांमधील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत खा.महासंसदरत्न डॉक्टर हिना गावित, आमदार राजेश पाडवी, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मकरंदभाई पाटील, रिपाईचे अरविंद कुंवर, नंदुरबार जिल्हा परिषदेतील सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाई, ईश्वर भाई, विजूभाई आणि अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील अडचणीत आलेल्या सहकारी प्रकल्पांना पुन्हा उर्जित अवस्थेत आणायचे आहे आणि ती जबाबदारी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या माध्यमातून पार पाडली जाईल असा विश्वास व्यक्त करतानाच मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, शहादा तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यातिल सिंचन प्रश्न संपुष्टात यावयासाठी आम्ही प्रभावी योजना आणत गेलो परंतु आमच्या विरोधकांनी कायम त्यात खोडा घातला. नर्मदेचे पाणी बोगद्याच्या माध्यमातून आणण्याचे महत्त्वकांक्षी कामाबद्दल त्यांनी अशीच दिशाभूल चालवली आहे. संविधानाला धक्का लागणार नाही हे जाहीरपणे पंतप्रधान मोदी सांगत असताना त्यावरही ते मतदारांची दिशाभूल करतात कारण लोकांसाठी काय केले आणि काय करणार हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे मुद्दे नाहीत आणि म्हणून यापुढे मतदारांनी त्यांच्या प्रचाराला बळी पडू नये; असे आवाहन मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.
या उपस्थितांना संबोधित करताना खासदार महासंसदरत्न डॉक्टर हिना गावित यांनी उज्वला गॅस घरकुल आणि तत्सम योजनांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या व सिंचनाच्या प्रश्नाला यापुढे प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
खासदार डॉक्टर हिना गावित भाषणात म्हणाल्या, नर्मदेचे पाणी शहाद्यापर्यंत आणण्या सारखे प्रकल्प राबवून अक्कलकुवा तळोदा धडगाव आणि शहादा तालुक्यांसह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात शंभर टक्के सिंचन केले जाणार आहे त्यासाठी जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून दहा हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प मार्गी लावला असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न संपवण्यासाठी ग्राउंड वॉटर रिचार्ज म्हणजे भूजल भरण प्रकल्पावर सुद्धा लक्ष केंद्रित केले आहे; अशी माहिती खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली.
आमदार राजेश पाडवी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, अजित दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे नवीन मित्र पक्ष जोडले गेल्याने महाराष्ट्रात त्याचप्रमाणे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सुद्धा महायुतीची शक्ती वाढली आहे. शिवाय आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी चौफेर केलेली विकासाची कामे जनतेच्या समोर आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत खासदार डॉक्टर हिना गावित यांना शहादा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मागच्या वेळेस पेक्षा अनेक पटींनी मताधिक्य मिळवून द्यायचे आहे आणि त्यासाठी प्रत्येक गावात कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवावा; असे आवाहन याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेश पाडवी यांनी केले.
मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकार यांच्या माध्यमातून केलेला जनविकास लोकांसमोर आहे आणि म्हणूनच महायुतीच्या म्हणजे भाजपाच्या उमेदवारांना मोठा जन पाठिंबा दिसून येत आहे तथापि तुमच्या भागात मोदी सरकारने काय दिले,
राज्य सरकारने काय दिले, देवेंद्र फडणवीस व शिंदे यांनी काय दिले, अजित दादांनी काय दिले हे आपापल्या गावी जाऊन सांगा. दलीत, ओबीसी, आदिवासी, दुर्बल अशा सर्वच घटकांसाठी काय काय केले ते आपण सर्व लोकांना पुन्हा गावा गावातल्या सभा बैठकांमधून माहीत करून द्या, असे आवाहन याप्रसंगी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह अन्य प्रमुख वक्त्यांनी केले.