नंदुरबार l प्रतिनिधी
गोवा राज्यात निर्मित दारूची बनावट कागदपत्राद्वारे अवैध वाहतूक करणारी सुमारे दहा लाख रुपये किमतीची मालट्रक व 33 लाख साठ हजार रुपये रुपये किमतीची विदेशी विस्की असा एकूण 43 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शहादा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित तीन आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे अहमदनगर येथून शहादा येथील एका मेडिकल दुकानाच्या नावे बनावट बिलाच्या माध्यमातून सदर मद्य शहादा येथे आणले जात होते.
शहादा दोंडाईचा रस्त्यावरील पोलीस स्टेशन समोरील संविधान चौकात टाटा कंपनीची 710 मालवाहु गाडी क्र. एम.एच. 04 एल.क्यु. 5962 याचे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी तपासणी केली असता त्यात संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. याबाबत चालकाला व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी सदर मालवाहू ट्रक शहादा पोलीस ठाण्याला आल्यानंतर तेथे पोलिसांनी तपासणी केली असता गोवा राज्यात निर्मित विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आल्याने पोलिसही आश्चर्यचकित झाले.
या तपासणी दरम्यान पोलिसांना सदर ट्रक मध्ये गोवा राज्यात निर्मित रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीचे एकूण 500 बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये 180 mlच्या 48 बॉटल्स अशा एकूण 23 हजार बॉटल्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच 5000/- रुपये किमतीचा एक व्हिवो कंपनीचा काळ्या रंगाचा ड्युएल सिम मोबाईल, 5000/- रुपये किमतीचा एक रिअल मी कंपनीचा सिल्व्हर रंगाचा ड्युएल सिम मोबाईल व 10,00,000/- रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा बंद बॉडीचा टाटा कंपनीची 710 मालवाहु गाडीक्र. एम.एच. 04 एल.क्यु. 5962 ट्रक असा एकूण 43 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी शहादा पोलिसात पोलीस शिपाई सचिन बापु कापडे याच्या फिर्यादीवरून अज्जु खान रशिद खान (वय 27 वर्षे, रा. खडकपाणी ता. कसरावद जि. खरगोन, मध्यप्रदेश), मोहंम्मद महेफुज मोहंम्मद लियाकत शहा (वय-25 वर्षे, रा. पनाह नगर, बराई, मियाँ कापुरवा ता. कुंडा प्रतापगड, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) यांच्यासह पाच आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित तिघे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. पुढील तपास तपास उपनिरीक्षक छगन चव्हाण करत आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या मालट्रक चालकाकडे पन्नास हजार रुपये किमतीचे शहादा येथील एका मेडिकल दुकानाच्या नावाने असलेले बिल होते व त्यावर औषधी साठा असे नमूद करण्यात आलेले होते फक्त 50 हजार रुपये किमतीचे औषधी साठा व तोही संपूर्ण ट्रकभर यामुळे पोलिसांना याप्रकरणी संशय निर्माण झाला त्यात चालकाने उडवा उडवी ची उत्तरे दिल्याने व त्याच्यासोबत असलेले इतर तीन पोलिसांनी गाडीला थांबविल्यानंतर फरार झाल्याने पोलिसांनी या संपूर्ण गाडीची गांभीर्याने तपासणी केली त्यावेळी यात औषध साठाच्या नावाखाली गोवा राज्यात निर्मित मद्यसाठाची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे हा माल शहादा येथे आणण्यात येत होता की तो अन्यत्र कुठे नेण्यात येणार होता याबाबत सखोल चौकशी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. यापूर्वीही औषध साठ्याच्या नावाखाली राज्यात प्रतिबंधित असलेला गुटक्याची वाहतूक केली जात असल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली असल्याने नेमका औषध साठ्याचा वापर कोण डोकेबाज करीत आहे, यामागचा मास्टरमाईंड कोण याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदरची कारवाई हे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उपनिरीक्षक अभिजीत आहिरे, पोलीस कर्मचारी दिनकर चव्हाण, दत्ता बागल, योगेश थोरात, घनश्याम सुर्यवंशी, मुकेश राठोड, राकेश मोरे, अनमोल राठोड आदि कर्मचाऱ्यांनी बजावली.