नंदुरबार | प्रतिनिधी-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा नंदुरबारच्या वतीने सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने रात्री स्मशान सहल उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चमत्कारामागील विज्ञान कार्यक्रम सादर करण्यात आला.
समाजामध्ये अमावस्या व पौर्णिमा याबद्दल अनेक प्रकारचे अंधश्रद्धा दिसून येतात. त्यात सर्वपित्री आमावस्या म्हटली तर त्याबाबत अनेक समज-गैरसमज समाजात दिसून येतात. याबाबत समाजात प्रबोधन व्हावे व लोकांच्या मनातील भिती नष्ट व्हावी या प्रयत्नांसाठी महाराष्ट्र अंनिसच्या नंदुरबार शाखेच्या वतीने स्मशान सहल उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सर्वपित्री अमावस्येच्या रात्री ९ ते १२ दरम्यान नंदुरबार येथिल अमरधाम अंनिसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा उपक्रम राबविला. या उपक्रमात स्मशानभूमीत रात्री अंनिसचे नंदुरबार शाखेचे प्रधान सचिव वसंत वळवी यांनी भूत निर्मितीचे वेगवेगळे चमत्कार सादर करून त्या मागील विज्ञान किंवा हातचलाखी कशी केली जाते हे स्पष्ट केले.
याप्रसंगी महा अंनिस चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सी.डी. महाजन यांनी प्रत्येक धर्मात अमावस्या, पौर्णिमा आणि आत्मा तसेच चमत्कार बाबत अंधश्रद्धा असतात, ते नाकारून प्रत्येक धर्मात मानवजातीला पूरक असे तत्वज्ञान असते ते स्विकारले पाहिजे असे आवाहन केले. नंदुरबार शाखेचे अध्यक्ष डॉ.प्रसाद सोनार यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक अंधश्रद्धेची निर्मिती भीतीपासूनच होत असते मग ती आपले आर्थिक मानसिक व शारीरिक शोषण करून घेण्यासाठी पूरक ठरत असते,म्हणून भीती कशी नाहीशी होईल याबाबत वेगवेगळे उदाहरण देऊन स्पष्टीकरण केले. दरम्यान कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गैरसमजातून भुत-पिशाच्च संदर्भात निर्माण झालेले अंधश्रद्धा या बाबत स्वअनुभव कथन केले. या उपक्रमात नंदुरबार शाखेचे कार्याध्यक्ष सूर्यकांत आगळे, बलदेव वसईकर, दिपक चौधरी, फिरोज खान, सामाजिक कार्यकर्ते इंजि.डी.के.नेरकर, बाळासाहेब ब्राह्मणे, आप्पा वाघ, राजा डॅनीयल, प्रविण ब्राह्मणे, राहुल निकम, जितू तायडे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन शाखेचे निधी व्यवस्थापन कार्यवाह दिपक चौधरी यांनी केले. कोविड नियमांचे पालन करून सदर उपक्रम यशस्वी करण्यात आला.