नंदुरबार | प्रतिनिधी-
तालुक्यातील निंबोणी ग्रामपंचायत अंतर्गत गाव हगणदारीमुक्तीबाबत शाश्वतता राहावी व वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबाबत ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारताच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने नंदुरबार तालुक्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.इ. फाउंडेशन, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने फिनिश सोसायटी या सामाजिक संस्थेच्या वतीने निंबोणी येथे शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करून गावात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शौचालयाचा नियमित वापर, सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन या विषयाला अनुसरून गावफेरी काढण्यात आली. तसेच सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत गावात तयार करण्यात आलेल्या शोष खड्ड्यांची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती पवार यांनी फिनीश सोसायटीच्या वतीने शाश्वत उघड्यावरील हागणदारीमुक्त अभियानांतर्गत केलेल्या कामाची पाहणी केली. जिल्हा परिषद शाळा निंबोणी येथे हँडवॉश स्टेशन व मुलींसाठी शौचालय व मुतारी या बांधकामाची पाहणी केली. गावातील व शाळेतील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच हागणदारी मुक्तीचे फायदे आणि तोटे यावर मार्गदर्शन करण्यात आले. यात पुरुषांना व महिलांना शौचालय वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी सहायक गट विकास अधिकारी श्रीमती पवार, पंचायत समिती नंदुरबार, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री.निकुंभे, कोठली जिल्हा परिषदे केंद्रशाळाप्रमुख एस.एम.पाटील,फिनिश सोसायटीच्या प्रकल्प व्यवस्थापक आकांक्षा बोरकर, बीसीसी अधिकारी मंगेश निकम, प्रकल्प अधिकारी निशांक गजभिये,प्रकल्प सहायक वैभव खांडवी, राकेश गुरव,सुनीता भोये, किशोरी ठकार,दारासिंग पावरा, निलेश पगारे, सचिन साळुंके, मारोती चिमणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नितीन महानुभाव यांनी केले. ग्रामपंचायत निंबोणी, सरपंच, ग्रामसेवक व जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक व शिक्षक तसेच ग्रामस्थ निंबोणी यांचे विशेष सहकार्य लाभले.