नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील बोराळे व समशेरपुर या ०२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे तालुकास्तरावर आरक्षण निश्चिती ४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय, नंदुरबार येथे होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) गोविंद दाणेज यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडील अधिसूचनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील एकुण १५ ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्राबाहेरील असल्याने ०१ जानेवारी २०२४ ते ०४ मार्च २०२५ या कालावधीसाठी बिगर आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षणाबाबत निर्देश दिलेले असून १५ ग्रामपंचायतींचे ४ सरपंच पदे नागरिकाचा मागास प्रवर्ग या प्रवर्गसह आरक्षित केल्याचे अधिसुचित केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेर येणाऱ्या १५ ग्रामपंचायतींसाठी सन २०२० मध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी २ सरपंच पदे ही नागरिकाचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव होती. त्यामुळे अतिरिक्त २ सरपंच पदांसाठी ना.मा.प्र. प्रवर्गासाठी आरक्षित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. हे आरक्षण ०१ जानेवारी २०२४ ते दिनांक ०४ मार्च २०२५ या कालावधीसाठी सार्वत्रिक निवडणूका होऊन गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी लागू असणार आहे.
आरक्षण निश्चितीच्या सभेसाठी संबंधित ग्रामपंचायतींचे नागरिक, सदस्य यांना उपस्थित रहावे असेही आवाहन उपजिल्हाधिकारी श्री. दाणेज यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.