नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा एसटी महामंडळातील आगाराचे वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे (वय ५३) यांच्या खुनाचा गुन्हा उघड झाला असून प्रेमविवाहातून पत्नीशी झालेल्या वादातून सासऱ्याच्या खुन झाल्याचे समोर आले आहे.जावई याने तीन लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांसह जावयालाही अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील नांदर्डे शिवारातील फरशी पुलाखाली दि. १६ मार्च रोजी किराणा घेण्यासाठी गेलेले शहादा आगारातील वाहक राजेंद्र मराठे यांचा मृतदेह आढळला होता.त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता.
राजेंद्र मराठे यांच्या मुलीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या नंदूरबार येथील गोविंद सोनार याचे कालांतराने पत्नीसोबत बिनसले होते. यातून त्यांच्यात सतत कौटुंबिक वाद होत होते. वादातून गोविंद हा त्याच्या मुलाला घेऊन नंदुरबार येथील आई- वडिलांकडे राहत होता. पत्नीसोबतचा वाद टोकाला गेल्याने गोविंद याने थेट सासऱ्याची सुपारी देऊन खून केला.
मयत राजेंद्र मराठे हे शहादा आगारात वाहक असल्याने त्यांची बसस्थानक परिसरातील हॉटेलमध्ये ओळख होती. यातून या ठिकाणी काम करणारे नीलेश बच्चू पाटील (२४) आणि विक्की किशोर बिरारे (२३) यांच्यासोबत त्यांचा संपर्क होता. याची माहिती जावई गोविंद सुरेश सोनार (३५) याला होती. यातून त्याने या दोघांसोबत संपर्क करुन तीन लाखांत राजेंद्र मराठे यांच्या खुनाची सुपारी दिल्याची माहिती आहे. १४ रोजी मुलासोबत किराणा करण्यासाठी आलेल्या मराठे यांना या दोघांनीच आपल्यासोबत नेले होते. दोघांसोबत या गुन्ह्यात दोघे अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.
खून केल्यानंतर चौघेही सुरत मार्गाने मुंबईत गेले होते. कांदिवली येथे हेअर सलूनमध्ये केस कापत असताना एलसीबीच्या पथकाने चौघांना अटक केल्यावर त्यांनी राजेंद्र मराठे यांचा खून केल्याची कबुली दिली. मोबाईल लोकेशन नांदर्डे शिवारात असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता.
नंदुरबार एलसीबीच्या पथकाने कांदिवली येथून नीलेश बच्चू पाटील (वय २४) आणि विक्की किशोर बिरारे (२३) आणि दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले होते. या चौघांनी गोविंद सुरेश सोनार (३४, रा.नंदुरबार) याने तीन लाखांची सुपारी दिल्याने खून केल्याची कबुली दिली होती. गोविंद सोनार याला पोलिस पथकाने नंदुरबारातून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी संशयितांना पकडण्याची मोहीम राबवली होती.