नंदूरबार l प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडीचे 2 गुन्हे उघड करण्यात आले असून एकूण 4 लक्ष 83 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस गुन्हे बैठकीत जिल्ह्यातील मालमत्तेविरुध्छ्चे घरफोडी, चोरी इत्यादी गुन्ह्यांचा गुन्हे आढावा दरमहा घेण्यात येत असतो. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याने पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आवाहन होते. त्याअनुषंगाने घरफोडीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी गुन्हे बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्यात 19 फेब्रुवारी 2024 रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून अज्ञात आरोपीतांनी घरात प्रवेश करुन 3 लक्ष 10 हजार 600 रु. किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणून तसेच भा. द. वि. कलम 454, 457, 380 प्रमाणे 20 फेब्रुवारी 2024 रोजी दाखल गुन्हयातील फिर्यादी यांचे घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून अज्ञात आरोपीतांनी घरात प्रवेश करुन
एकूण 1 लक्ष 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणून, दोन्ही गुन्हयात अज्ञात आरोपीतां विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानुसार नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्गत करण्याबाबत आदेशीत केले.
गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतांना बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील एकता नगरमध्ये राहणारा शरद अरुण चव्हाण उर्फ पवन गोंधळी व त्याचे साथीदारांनी मिळून सदरचा गुन्हा केलेला असून तो सध्या पळून गेला आहे, अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे पथकाने संशयित आरोपी शरद चव्हाण उर्फ पवन गोंधळी यास ताब्यात घेऊन त्याचे साथीदार हरपालसिंग ओंकारसिंग सिकलीकर व त्याचा भाऊ समशेरसिंग ओंकारसिंग सिकलीकर दोन्ही रा. एकता नगर, नंदुरबार यांचे मदतीने केल्पाची माहिती दिली. व तसेच त्यांनी चोरी केलेला एकूण 3 लाख 50 हजार 760 रुपये किमतीचा मुद्देमाल काढुन दिला. तसेच उपनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 115/2024 प्रमाणे मधील गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतांना बातमी मिळाली की,
नंदुरबार शहरातील एकता नगर मध्ये राहणाऱ्या दोघांनी मिळून केला असून ते काळया रंगाच्या मोटार सायकलने सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचला असता एका काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर दोन संशयित येतांना दिसले त्यांना थांबवून विचारपूस करता ते दोन अल्पवयीन बालके असल्याचे समजले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेला एकूण 1 लाख 32 हजार 940 रुपये किमतीचे मुद्देमाल मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आला आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सपोनि. दिनेश भदाणे, पोहेकॉ मुकेश तावडे, पोना राकेश मोरे, पोना मोहन ढमढेरे, पोना मनोज नाईक, पोशि शोएब शेख, पोशि विजय धिवरे, पोशि अभय राजपूत, पोशि आनंदा मराठे, चापोना रमेश साळुंखे यांच्या पथकाने केली आहे.