नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री दिवसभर तळागाळातील जनतेत राहून त्यांना न्याय मिळावा यासाठी झटत आहेत.राज्यात प्रत्येत घटकाला योजनांच्या माध्यमातून लाभ मिळत आहे. भविष्यात शिवसेनेचे नंदुरबार जिह्यातून विधानसभेत २ आमदार पाठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन खा.डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले. यावेळी त्यांनी शहरी भागातील ‘आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत’ धडगाव- वरफड्या नगरपंचायतीला ८ कोटींच्या निधीला मंजुरी दिली.
शिवसेनेचा शिंदे गटाच्या आदिवासी मेळावा गुरुवारी घेण्यात आला. त्याप्रसंगी खा.डॉ शिंदे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खणीकर्म मंत्री दादाजी भुसे, संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,निरीक्षक राजेश पाटील,जिल्हा प्रमुख ऍड राम रघुवंशी, नगराध्यक्ष धनसिंग पावरा, जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जि.प सदस्य विजय पराडके, पं.स सभापती हिरा पराडके,नंदुरबार पं.स सभापती दीपमाला भील, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी खा. श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता यांच्यावर टीका करतांना म्हणाले,सध्या ‘ते’ गल्ली बोळात फिरून चावडीवर सभा घेत आहेत.पहिले मोठमोठ्या सभा घ्यायच्या. आता ५०० लोक जमवायला त्यांना नाकी नऊ येत आहे. संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, सरकारकडून जे विकास कामे होत आहेत ते आपणच करीत असल्याचे जिल्ह्यात भासवले जात आहे. आदिवासी विकास विभागाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच निधी मिळत आहे. पक्षाने ताकद दिली तर जिल्ह्यात शिवसेनेचे सहज २ आमदार सहज निवडू शकतील म्हणजे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची ताकद नंदुरबार जिल्ह्यात आहे. धडगाव नगरपंचायतीत १७ पैकी १३ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले आहेत.आज त्यांना बसण्यासाठी जागा नाही. सुसज्ज इमारत बनवायला पाहिजे.त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
कोर्टात टिकणारे आरक्षण दिले
गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न होता.त्यांना कोणीही आरक्षण द्यायला तयार नव्हतं परंतु,आता कमी कालावधीत संपूर्ण अभ्यास करून अडीच कोटी मराठ्यांच्या सर्व्हे करून कोर्टात टिकणारे आरक्षण महायुती शासनाने दिल्याचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
शिवसैनिकांवरील अन्याय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू; मंत्री दादाजी भुसे
जिल्ह्यातील शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यासपीठावरील मान्यवरांनी जाहीररित्या बोलून दाखवल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बाब पोचविणार असल्याचे बंदरे व खणीकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.ते म्हणाले, यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षाची दारं विशिष्ट लोकांसाठीच उघड असायचं. आज आपण जर पाहिलं तर रात्री ३ वाजेपर्यंत शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय झोपत नाही. वर्षा बंगल्यावर आता सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागात अनेक चांगल्या योजना राबविण्यात येत आहेत.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असलेले शिवसेनेचे कार्य जिल्ह्यात पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. राज्यात उद्योग विभागाच्या माध्यमातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत.