नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील कोठली येथील शासकीय मुलींचे आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता आठवीतील एका विद्यार्थिनीचा गळफासाने संशयितरित्या मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. या विद्यार्थिनीच्या मृत्यूची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेनेच्या राज्य सहसचिव तथा युवती सेनेच्या नंदुरबार जिल्हाप्रमुख मालती वळवी यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
नंदुरबार येथे शासकीय विश्रामगृहात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेनेच्या राज्य सहसचिव तथा युवती सेनेच्या नंदुरबार जिल्हाप्रमुख मालती वळवी यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी भिल्लीस्थान टायगर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार वळवी उपस्थित होते. यावेळी मालती वळवी यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील 282 विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाल्याची नोंद आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू होणे ही बाब संशयास्पद असून सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. नंदुरबार तालुक्यातील कोठली येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेत दि.१४ जानेवारी २०२४ रोजी सोनिया वाड्या नाईक या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गळफासाने संशयास्पद मृत्यू झाला आहे.
या विद्यार्थिनीचा मृतदेह एका खोलीत वरच्या मजल्यावर दोरीने बांधलेल्या स्थितीत मिळून आला आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटना ही संशयास्पद असून या प्रकरणाची प्रशासनाने त्वरित सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ येथे शासकीय आश्रमशाळेत व अक्कलकुवा तालुक्यातील कुंभारखान येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना घडली आहे. आता कोठली आश्रमशाळेत मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
यामुळे शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षा असुरक्षित असल्याचे दिसून येते. संबंधित प्रशासनाने त्वरित या घटनेची दखल घेऊन सखोल चौकशी करीत दोषींवर कडक कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मालती वळवी यांनी दिला आहे.








