नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद गट व १३ पंचायत समिती गणांसाठी उद्या दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेला मतमोजणीस सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे प्रतिष्ठापणाला लागली आहे. नंदुरबार येथे १४ टेबलवर २२ राऊंडमध्ये, शहादा येथे १४ टेबलवर १४ राऊंडमध्ये तर अक्कलकुवा येथे १२ टेबलवर ३ राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर नंदुरबार जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद गट व १३ पंचायत समिती गणासाठी आज दि.५ रोजी शांततेत मतदान पार पडले. उद्या दि.६ ऑक्टोबर रोजी नंदुरबार शहरातील जी.टी.पी. रस्त्यावरील शनिमंदिर समोर वखार महामंडळाचे गोडावूनमध्ये नंदुरबार तालुक्यातील ५ गट व ५ गणांसाठी सकाळी १० वाजेला मतमोजणीस सुरवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून सर्वातआधी पोष्टल मतपत्रिकांची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर इबीएम मशिनद्वारे झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. या १४ टेबलवर २२ राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे. यात सर्वप्रथम कोळदा गट त्यानंतर खोंडामळी, कोपर्ली, रनाळा, मांडळ या गटांची मतमोजणी होईल. त्यानंतर गुजरभवाली गण, पातोंडा गण, होळतर्फे हवेली गण, नांदर्खे गण व गुजरजांभोली या गणांची मतमोजणी होणार आहे. साधारणपणे दुपारी १२.३० वाजेपर्यंत सर्व निकाल लागणे अपेक्षीत आहे. या निकालांकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. मतपेटीत मतदारराजाने कोणाच्या पारडयात मतदान केले हे मतपेटी उघडल्यावर कळणार आहे. नंदुरबार तालुक्यातील या मतमोजणीसाठी ४० कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर शहादा तालुक्यातील जि.प. गट व पंचायत समिती गणांसाठी १४ टेबलवर १४ राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी ५० कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर अक्कलकुवा तालुक्यातील दोन गटांसाठी १२ टेबलांवर ३ राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी ४० कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.