बोरद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील तुळाजा ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या बेलीचा पाडा या सातपुड्याच्या कुशीत असलेल्या गावाला आमदार राजेश पाडवी यांनी ग्रामस्थांची सभा घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या पाड्यातील समस्या सोडविण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाडवी यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले.
तळोदा तालुक्यातील बेलीचापाडा येथील ग्रामस्थांनी आमदार राजेश पाडवी यांना समस्यांबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन आमदार पाडवी यांनी भेट देऊन ग्रामस्थांची सभा घेतली. या सभेत ग्रामस्थांनी गावातील अंगणवाडी, शाळा, रेशन, वीज व रस्ते आदी समस्या मांडल्या. या पाड्याची कुटुंब संख्या १०० पर्यंत आहे. गावात दोन वर्षांपूर्वी सौर ऊर्जेचे सहा दिवे दिले होते.
तसेच पाड्यातील अंगणवाडी व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चार किलोमीटर पायपीट करून तुळाजा येथील शाळेत जावे लागते. या सर्व समस्या जाणून घेतल्यावर आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की, हे गाव वन विभागाच्या हद्दीत येत असून, महसूल म्हणून या गावाला दर्जा नाही. यामुळेच शासनाच्या विविध योजना इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यासाठी संबंधित वन विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून यातून कसा मार्ग काढता येईल, याबाबत प्रशासनाशी चर्चा करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू. गावात अंगणवाडी, शाळा, रेशन व तुळाजापर्यंतचा रस्ता तातडीने करून पाण्याच्या सोयीसाठी हातपंप देण्यात येईल, असे सांगितले. यावेळी जि. प. सदस्या सुनीताबाई पवार, भरत पवार, तळोदा शहर अध्यक्ष गौरव वाणी, काळूसिंग पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
एकीकडे भारत अमृत महोत्सव साजरा करीत आहे. तर दुसरीकडे सातपुड्यातील नागरिकांना दळणवळण साठी रस्ता नाही, अंगणवाडीसाठी बालकांना चार किमी पायपीट करावी लागते. मुलांना शाळा, वीज, मोबाईल रेंज नाही. सदरील गाव वनविभागाच्या हद्दीत असल्याने महसूली दर्जा नाही. त्यामुळे ह्या गावाला जीवनावश्यक व मूलभूत सुविधा मिळण्याची मागणी येथील नागरिकांनी आमदार राजेश पाडवी यांना केली आहे.