नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने तीन ठिकाणी धाडी टाकत वाहनासह सुमारे सहा लाखांचा गुटखा जप्त केला आहे.
अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील जळका बाजारातील श्रीवास्तव प्रोव्हिजन व संजय पान सेंटर येथे तपासणी केली असता गुटखा आढळून आला. जगदीश दत्तात्रय कायस्थ यांच्या दुकानात ११ हजार २३२ रुपयांचे गुटखा व तंबाखूची १६३ पाकिटे तर रोहित संजय चौधरी यांच्या मालकीच्या पान सेंटरमध्ये ३ हजार ५११ रुपयांचे पाऊच आढळून आले.
अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी फिर्याद दिली. तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे .तसेच नंदूरबार शहरातील देसाईपुरा परिसरात वाहन (क्र. एमएच ३९ एबी ६९८९) उभे असताना तिची राज्य उत्पादनच्या पथकाने तपासणी केली असता त्यामध्ये २ लाख २० हजार ४३२ रुपये किमतीचे गुटखा तंबाखूचे सुमारे २ हजार ३२९ पाकिटे आढळून आली. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले अन्न पदार्थ विक्रीसाठी साठा केल्याचे आढळून आल्याने वाहनासह गुटखा असा ५ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर आहेर करीत आहेत. ही कारवाई सहायक आयुक्त दिनेश तांबोळी यांनी केली.