नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र उत्पादन वाढविण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना राबविण्यात येत असून यासाठी महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावित, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
फलोत्पादन पिकांचे संशोधन तंत्रज्ञान, प्रसार, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा, पॅक हाऊस उभारणी, शेडनेट हाऊस उभारणी, व क्षेत्रविस्तार यांच्या माध्यमातून सर्वागीण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, पारंपरिक उत्पादन पद्धतीचा आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालून तंत्रज्ञान विकास व प्रसार आणि प्रचार करणे आदी या योजनेचे उद्दिष्टे असून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत 14 व्या लॉटरी सायकलमध्ये महाडीबीटी प्रणालीवर लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. या नव्याने निवडलेल्या लाभार्थ्यांनी नजीकच्या सीएससी सेंटर तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना संपर्क साधून कागदपत्रे तात्काळ अपलोड करून घ्यावीत.
सर्वसाधारण, अनु. जाती, अनु. जमाती प्रवर्गातील एकूण 1 हजार 24 शेतकऱ्यांची विविध घटकासाठी निवड झालेली असून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2023-24 अंतर्गत मोठ्या प्रमाणात लक्षांक शिल्लक आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असेही श्री. वाणी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.