नंदुरबार l प्रतिनिधी
ओबीसीत तुटपुंज्या स्वरुपात असलेल्या आरक्षणात घुसून वाटेकरी होण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी यापार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने नंदुरबार येथे ओबीसी आरक्षण अधिकार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विविध मागण्यांमध्ये केंद्रीय महानिबंधक किंवा निती आयोग यांच्यामार्फत संपूर्ण देशात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, बिहार राज्याच्या धर्तीवर सरकारनेही राज्यव्यापी ओबीसी जातनिहाय जनगणना शासनाच्यावतीने करावी, शैक्षणिक शाळा चालविण्यासाठी इतरत्र कुठल्याही संस्थेकडे न देता शासनाने स्वत:मार्फत चालव्याव्या, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एक व विद्यार्थिनींसाठी एक वस्तीगृह बांधून द्यावे, क्रिमीलेयरची जाचक अट ओबींसींसाठी रद्द करण्यात यावी, ओबीसींना खासगी क्षेत्रात आरक्षण द्यावे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान, दि.२९ ऑक्टोबर रोजी नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात दुपारी २ वाजता यासंदर्भात ओबीसींची जनजागृती करण्यासाठी ओबीसी आरक्षण महामेळावा संपन्न होणार असून याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी नगरसेवक मोहन माळी, जगन्नाथ माळी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, कार्याध्यक्ष मधुकर माळी, सरचिटणीस रामकृष्ण मोरे, माजी नगरसेवक ॲड.प्रकाश भोई यांच्यासह ईश्वर धामणे, वासुदेव माळी, पुंडलिक माळी, गोरखनाथ बावा आदी उपस्थित होते. महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.