खापर l प्रतिनिधी
दरवर्षी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. सदर दिवशी दरवर्षी देशभरात स्वच्छता जनआंदोलन साजरे केले जाते. यावर्षी देखील स्वच्छ भारत दिवस २०२३ च्या निमित्ताने दि. १५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता ही सेवा (SHS) उपक्रम स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत.
त्यानुसार स्वच्छता ही सेवा २०२३ ची थीम “कचरामुक्त भारत” आहे.त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती अक्कलकुवा येथे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होणे कामी व आरोग्य चांगले राहण्यासाठी संदेश देणे कामी स्वच्छता रन/ रॅली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास तालुक्याचे विधान परिषद सदस्य आमदार आमश्या पाडवी, व अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती. उषाबाई बोरा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रन/रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. सदर रॅली अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीतून काढण्यात आली व रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले.
सदर कार्यक्रमास तालुक्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी युवराज पवार, गट शिक्षण अधिकारी मंगेश निकुंभ, सहाय्यक प्रशासन अधिकारीअरविंद अहिरे, ग्रामपंचायतीचे व पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच अधिकारी /कर्मचारी, पोलीस कर्मचारी व पत्रकार बंधू उपस्थित होते.
यानंतर आमदार आमश्या पाडवी यांचा सत्कार न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय शिवदे यांनी शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल अक्कलकुवा, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल, मौलाना अब्दुल कलाम आझाद हायस्कूल,आदर्श प्राथमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा (१,२,३) अक्कलकुवाचे प्राचार्य/मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी/ विद्यार्थिनी उपस्थीत होते.








