नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरात मोकाट फिरणारे 263 जनावरे नगरपालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई करीत कोंडवाड्यात जमा केले आहे.
19 ते 28 सप्टेंबर 2023 दरम्यान गणेशोत्सव सण साजरा करण्यात येणार आहे. तसेच 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हा सण साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथील संवाद हॉल येथे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती.
बैठकी दरम्यान शांतता समितीच्या सदस्यांच्या वतीने काही सूचना / अडचणी यावेळी मांडल्या होत्या त्यात प्रामुख्याने शहादा व नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होवून अपघाताची शक्यता असते. तसेच रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे बऱ्याचवेळा वाहतूक देखील खोळंबते. त्यावर पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी बैठकीला उपस्थित नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वप्नी मुदलवाडकर, तळोदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय कापडणीस, शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश शिनारे यांना रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांना कोंडवाडा किंवा गौशाळेत जमा करणेबाबतच्या सूचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी स्थानिक पोलीसांच्या मदतीने शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून कोंडवाड्यात जमा करण्याची विशेष मोहिम राबविली. त्यात नंदुरबार शहरातील 263 मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून कोंडवाड्यात जमा करण्यात आले आहे. त्यापैकी 152 जनावर मालकांना नगरपालिकेने आर्थिक दंड केला आहे.
शांतता समितीच्या बैठकी दरम्यान पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी उपस्थित शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सव काळात इतर शासकीय विभागाशी संबंधीत काही अडचणी असल्यास हेल्पलाईन नंबर 9309929966 यावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.