नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार -धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या तापी नदीवरील सारंगखेडा पुलाला आज भगदाड पडल्याने पोलिसांनी पुलावरील वाहतूक बंद केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तापी नदीवरील सारंगखेडा पुलाला आज भगदाड पडले आहे. नंदुरबार धुळे जिल्ह्याला जोडणारा हा महत्वाचा पुल आहे.दोंडाईच्या च्या बाजूने पुलावरील रस्त्याचा भराव वाहून गेल्याने पुलावर भगदाड पडून त्याभागावरील रस्त्याला तडे देखील निर्माण झाले आहे.

हा शंभर वर्ष जुना तापी नदीवरील ब्रिटीश कालीन पुल असून तीनच वर्षांपुर्वी याचे ऑडीट करुन यावर दुरुस्ती घेण्यात आली होती. यासाठी या पुलावरील वाहतूक महिने दोन महिने बंद ठेवण्यात आली होती. सध्य़ा सारंगखेडा बॅरेजमधून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग असल्याने तापी नदीला पुर सदृश्य परिस्थीती आहे. अशातच पुलाचा भराव वाहून गेल्याने याकामाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भगदाड पडल्यानंतर दोडांईचा पोलीसांनी नंदुरबार चौफुली तर शहादा पोलीसांनी अनरद बारीजवळून या पुलाकडे येणारी वाहतूक वळवली आहे. आणि याबाबत प्रशासनाने महामार्ग विभागाशी देखील संपर्क केला आहे.







