नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहर हद्दीतुन चोरलेली ३ लाखाची बोलेरो गाडी चोरीच्या गुन्ह्यातील २ आंतरराज्यीय आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने राजस्थानमधून अटक करण्यात आली असून चोरलेली गाडी मध्यप्रदेशातुन हस्तगत करण्यात आली आहे. याशिवाय २ लॅपटॉप, २ मोबाईल हॅन्डसेट १ एलएडी टिव्ही, २ कॅम्प्युटर मॉनीटर, १० बनावट नंबर प्लेट्स, बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड,मतदार ओळखपत्रे ड्रायव्हिंग लायसेन्स कंपनीचे बनावट ओळखपत्रे असा एकूण ३ लाख ४८ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१८ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी २.३० ते ३.३० वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील मनोहर सतीलाल बागुल (वय-३४, धंदा-शेती रा. महादेव नगर जगतापवाडी नंदुरबार) यांच्या मालकीची ३ लाख रुपये किमतीची बोलेरो (क्र. एमएच २० सीएस २३६२) ही राजीव गांधीनगर प्लॉट क्र-ं १४३ च्या घरासमोरुन चोरी झाली होती. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाख़ल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी सपोनि संदिप पाटील, पोहवा प्रमोद सोनवणे, पोहवा विनोद जाधव, पोना राकेश मोरे, पोकॉ विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांचे पथक तयार केले. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सशयितांनी फिर्यादीजवळ सोडलेल्या मोटर सायकलची माहिती घेतली. संपर्कासाठी वापरलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती घेतली. सर्व माहितीचे विश्लेषण करुन संशयीत आरोपी सध्या राजस्थान राज्यातील बारां या शहरात असल्याची खात्री केली. त्यानुसार पथकाने दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी बारां हे शहर गाठले. बारां शहरात संशयीत आरोपींचा दोन दिवस शोध घेऊन गुन्ह्यातील संशयीतांना स्थानिक पोलीसांचे मदतीने एका लॉजमधुन ताब्यात घेतले.
त्यांना गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सदरचे आरोपी हे गुगल मॅपवरुन वेगवेगळ्या गावांचा शोध घेऊन त्या त्या गावांना भेटी देतात. भेटीदरम्यान ते गावात एक ऑफीस स्थापन करतात. त्यात मायक्रो फायनांन्स कंपनी असल्याचे बॅनर लावून परिसरात कंपनीचे नाव व स्वतःचा क्रमांक असलेल्या पिवळ्या पावत्या वाटप करतात व त्याद्वारे १००/२०० रुपयांमध्ये मोठा इंन्शुरन्स करण्यासाठी लोकांना आमीष देतात. त्यानंतर संपर्क करणार्या ग्राहकांना बचत गटामार्फत ३० ते ४० हजार रुपये कर्ज मिळवून देण्यात येईल असे सांगुन प्रोसेसिंग फीच्या नावाने प्रत्येकी २ ते ३ हजार रुपये जमा करतात. दोन तीन दिवसात जी काही रक्कम जमा होईल ती घेऊन ते पोबारा करतात. फसवणूक होणारी वैयक्तीक रक्कम छोटी असल्याने शक्यतो कोणी पोलीसात तक्रार करीत नाही. तसेच दुसर्या वेळी ज्या ठिकाणी फसवणूक केली आहे तेथून ३०० ते १००० किमी अतंरावर दुसरे ठिकाण निवडतात. त्यामुळे ते सहजासहजी पोलीसांच्या जाळ्यात देखील सापडत नाहीत. त्यादृष्टीने नंदुरबार येथे देखील त्यांनी गांधी नगरमध्ये एक घर भाडेतत्वावर घेऊन त्यात सुर्योदय मायक्रो ग्रुप लिमीटेड कंपनी या नावाने ऑफीस सुरु केले होते. तथापि नंदुरबार येथे अपेक्षीत ग्राहक न मिळाल्याने त्यांनी नमुद गुन्ह्यातील फिर्यादी यांना गाडी भाडेतत्वावर घेण्याचे आमीष देऊन गाडी घेऊन पोबारा केला होता. त्यानंतर ते अशा प्रकारे फसवणूक सुरु करण्यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
सशंयीतांकडे चोरलेल्या गाडीशिवाय २ लॅपटॉप, २ मोबाईल हॅन्डसेट १ एलएडी टिव्ही, २ कॅम्प्युटर मॉनीटर, १० बनावट नंबर प्लेट्स, बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड,मतदार ओळखपत्रे ड्रायव्हिंग लायसेन्स कंपनीचे बनावट ओळखपत्रे असा एकूण ३ लाख ४८ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सपोनि संदिप पाटील, पोहवा प्रमोद सोनवणे, पोहवा विनोद जाधव, पोना राकेश मोरे, पोकॉ विजय ढिवरे,अभय राजपुत,आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.
पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांचे आवाहन
बाहेर राज्यातील आरोपी विश्वास संपादन करुन कमी व्याजाचे कर्ज मिळवुन देणे, कमी पैशात जास्त रकमेचा विमा काढुन देणे, भीशी चालविणे याद्वारे फसवणूक करतात. असे आरोपी हे बनावट कागदपत्रांद्वारे असे गुन्हे करत असल्याने त्यांचा शोध घेणे कठीण असते. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता असा प्रकार आपल्या परिसरात होत असेल एक दक्ष नागरिक या नात्याने तर तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यास सुचित करावे, असे आवाहन केले आहे.