नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा तालुक्यातील घोटलेपाडा व लंगडी भवानी येथे पोलिसांनी दोन्ही ठिकाणच्या शेतात धाडी टाकून २४ लाख रुपयांची गांजाची झाडे ताब्यात घेतली आहेत. या कारवाईत तब्बल अडीच क्विंटल गांजाची झाडे पोलिसांनी कापणी करून ताब्यात घेतली आहेत.
शहादा तालुक्यातील घोटलेपाडा या ठिकाणी शेतात गांजाची झाडे लावल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजन मोरे यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी सोमवारी सायंकाळी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोनवणे, उपनिरीक्षक मराठे, हेड कॉन्स्टेबल योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, दिनकर चव्हाण, भरत उगले, योगेश माळी, आतिक पटेल यांच्यासह घोटलेपाडा शिवारात धाड टाकली होती. या ठिकाणी पोलिस पथकाला गांजाचे पीक घेतले जात असल्याचे दिसून आले होते. या पिकाची कापणी करून २ क्विंटल ३२ किलो ८०० ग्रॅम गांजाची झाडे ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुमान ठोबल्या पावरा रा. घोटलेपाडा, ता. शहादा याच्याविरोधात शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लंगडी भवानी येथील दिलवरसिंग रायसिंग भिल याने शेतात ८ किलो २२० ग्रॅम गांजा लपवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असताना आठ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राजन मोरे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोनवणे, हेड कॉन्स्टेबल योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, विकास शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल दिनकर चव्हाण, भरत उगले, योगेश माळी, आतिक पटेल, देवा विसपुते, युवराज राठोड यांनी केली. नायब तहसीलदार शैलेंद्र गवते यांनी भेट देत पंचनामा केला.