नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मोठा मारूतीकडून भाजीमार्केटमध्ये कांद्यांनी भरलेल्या भरधाव वेगातील ट्रॅक्टवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर दुभाजक तोडून दवाखान्याचा भिंतीला धडकला. यात ट्रॅक्टर चालक चाकाखाली आल्याने त्याचे निधन झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील गजबजलेल्या मुख्य अंधारे चौकात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरचा थरार नागरीकांनी अनुभवला. नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील रमण रामा ठाकरे हा त्याच्या ताब्यातील लाल रंगाचे ट्रॅक्टर कांद्यांनी भरलेल्या ट्रॉलीसह मोठा मारूतीकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी घेवून जात असतांना त्याच्या ट्रॅक्टर भरधाव असल्याने त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. हे ट्रॅक्टर अंधारेचौक याठिकाणी असलेल्या शुभेच्छा बॅनवर धडकले. त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या दुभाजक तोडत अंधारे हॉस्पिटलच्या भिंतीवर धडकले.यात ती भिंत पडली. यावेळी चालकाचा ट्रॅक्टरवरून तोल गेल्याने तो खाली पडला व ट्रॉलीचे मागील चाक त्याचा अंगावरून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्याठिकाणी हजर झाले. नंदुरबार शहरातील पोलीसांनी आपल्या वाहनातून रमण रामा ठाकरे (वय ३८) याला रूग्णालयात नेले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर याठिकाणी मोठया प्रमाणावर वाहतुक ठप्प झाली होती. पोलीसांनी ही वाहतुक सुरळीत केली. दरम्यान अंधारेचौकात कायमच वर्दळ असते. त्याठिकाणी अपघात झाला. तेथे रिक्षाच्या थांबा आहे. परंतु सुदैवाने याठिकाणी एकही रिक्षा नसल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी पोलीस कॉस्टेबल प्रविण शांतीलाल पटेल यांच्या फिर्यादीवरून मयत रमण रामा ठाकरे याच्या विरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई स्नेहदिप शिंदे करीत आहेत.