नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीसांनी सामाजिक बांधिलकी जपत तळोदा तालुक्यातील लोभाणी येथील वाल्हेरी नदीवरील पुलाखाली साठलेला गाळ श्रमदानातून काढला आहे.

मागील काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या वरच्या भागात पाऊस झाल्यामुळे अनेक छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आलेला होता. मुख्य रस्त्यांवरील लहान नाल्यांना आलेल्या पुरामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतूकीला अडथळा होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्या होत्या. त्यामुळे सुटी संपवून जिल्ह्याच्या विविध ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच पाऊस झाल्यामुळे पेरणीसाठी आवश्यक असलेल्या शेती विषयक बाबींच्या खरेदी करण्यासाठी तळोदा किंवा नंदुरबार येथे जाणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना या सर्व अडचणी / समस्या माध्यमातून समजल्या होत्या.
मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे तळोदा तालुक्यातून जाणारा अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर महामार्गावरील लोभाणी गावाजवळील तापी नदीच्या वाल्हेरी उपनदीवरील पुलाच्या मोरीवर पावसाचे पाणी तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक खोळंबून पडली होती. पुलावरून वाहणाऱ्या पूराच्या पाण्यात धोका पत्करून वाहन धारकांनी वाहने काढल्याने त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला होता. तसेच लोभाणी गावातील 25 ते 30 घरांमध्ये पाणी शिरून मालमत्तेचे नुकसान झाले होते. पुलाच्या खालील 7 गाळ्यांपैकी फक्त 2 गाळे अर्धवट खुले असून 5 गाळे दोन्ही बाजूने पूर्णत: गाळाने भरले गेल्याने पुलाचे पाणी महामार्गावरून वाहत होते. पुलाखालील कचरा तसेच साचलेला गाळ काढला न गेल्यास अतिवृष्टी, पूराचा धोका वाढून मोठ्या प्रमाणात जिवीत व मालमत्तेची हानी होण्याची शक्यता होती.
सामाजिक बांधीलकीच्या जबाबदारीचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तळोदा तालुक्यातील अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर महामार्गावरील लोभाणी गावाजवळील परिस्थितीची पाहणी करुन आढावा घेतला व लोभाणी गावाजवळील पुलाच्या मोरीमधील कचरा व गाळ काढून पुल मोकळा करण्याची संकल्पना मांडली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अक्कलकुवा उप विभागातील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर महामार्गावरील लोभाणी गावाजवळील पुलाच्या मोरीमधील कचरा व गाळ काढण्याची योजना आखली.
20 जुलै रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्यासह लोभाणी गावातील व आजूबाजूच्या परिसरातील 40 ते 50 नागरिक व अक्कलकुवा विभागातील 50 ते 60 पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकुण 100 ते 150 जणांनी मिळून अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर महामार्गावरील लोभाणी गावाजवळील पुलाच्या मोरीमधील कचरा व गाळ जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढून श्रमदान केले. 2 दिवस लोभाणी गावाजवळील पुलाच्या मोरीखालील कचरा व गाळ काढण्याचे काम सुरू होते.
अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी याकामी पुढाकार घेवून आनंद पाडवी, अनील वळवी, जहांगीर भज्या प्रधान, अभिमन्यू दिलीप पाडवी, शनूबाई पाडवी, गणेश नाईक, ईश्वर प्रधान आदी स्थानिक नागरिकांच्या मदतीने 2 जेसीबी च्या सहाय्याने पूलाखालील गाळ बाजूला काढण्याचे काम 2 दिवसात पुर्ण केले.
पुलाच्या मोरीमधील कचरा काढून टाकल्याने सातपुड्याच्या डोंगर माथ्यावर झालेल्या पावसामुळे नदीस पूर आला तरी पाणी वाहून जाणार असल्याने लोभाणी गावातील पुराचे पाणी घरात शिरून मालमत्तेचे नुकसान होणाऱ्या 25 ते 30 कुटुंबांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तसेच पुलावर पुराचे पाणी नसल्याने वाहन धारकांच्या जिवीतास कोणताही धोका निर्माण होणार नाही. बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर नदीच्या पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने अनेकवेळा दोन्ही बाजूस वाहतूक कोंडी झाली होती. पुलाखालील गाळ काढल्याने नदीच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत झाल्याने वाहन धारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मान्सूनपूर्व योग्य ती सर्व तयारी केली असून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. पूर परिस्थिती किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत करण्यासाठी पोलीस ठाणे व पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोहणारे, शोध व बचाव साधनांची उपलब्धता करुन ठेवण्याचे देखील निर्देश दिले आहेत.
आपत्कालीन मदतीसाठी नागरिकांनी तात्काळ डायल-112 या टोल फ्री क्रमांकावर अगर नजीकच्या पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज असून त्याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्रत्येक पोलीस ठाणे येथे 2 प्रशिक्षीत कर्मचारी असून आपत्कालीन परिस्थितीसाठी लागणारे जेसीबी, क्रेन, लाईफ जॅकेट, दोर इत्यादी साहित्य उपलब्ध करुन ठेवण्यात आलेले आहे.








