नंदुरबार l प्रतिनिधी
सध्या पावसाळ्याचे दिवस असून नंदुरबार आगारातून लांब पल्ल्याच्या आणि विशेषतः रात्री सोडण्यात येणाऱ्या नादुरुस्त एसटीचा प्रवाशांना मनस्ताप होत असुन नाशिकहुन नंदुरबार प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमी त्रास सहन करावा लागत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत ग्राहक पंचायत संचलित प्रवासी महासंघाकडे प्रवाशांनी गाऱ्हाणी मांडली आहेत.
प्राप्त माहितीनुसार नाशिक येथुन गुरुवार दि.20 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता एम. एच.- 20 .बी.एल.-2661 क्रमांकाची नंदुरबार – नाशिक एशियाड बस निघाली. 7 वाजता सोग्रस फाटा येथे दिवे उपलब्ध नसल्याने बस थांबविण्यात आली. बसचे बाहेरील दिवे उपलब्ध नव्हतेच. याशिवाय आतीलही दिवे बंद असल्याने चालकास बुकिंग करताना देखील अडथळे निर्माण होत असल्याचे दिसून आले.प्रवाशांकडील मोबाईलच्या बॅटरीद्वारे तात्पुरत्या स्वरूपात वायरचा जुगाड करून बसचे पुढील दिवे लावण्यात आले. एक तास खोंळबा झाला.नाशिक येथून प्रवास करणाऱ्या देवळा येथील पगार नामक एसटी चालकाने चालक, वाहक आणि प्रवाशांच्या मदतीने जेमतेम जुगाड करून दिवे सुरू केले.
विशेष म्हणजे बसचे वायफर देखील बंद असल्याने पावसात चालकास अडचणी निर्माण झाल्या.सोग्रस येथून जेमतेम विरगावापर्यंत बस आली. याठिकाणी एका हॉटेलवर जेवणासाठी बस थांबली.मात्र दिवे नसल्याने बस पुढे मार्गस्थ होणार नाही.असे सांगून दुसऱ्या बसमधून प्रवास करण्याचे त्या वाहकाने सुचविले. त्यानंतर नाशिकहून एम. एच.14 के. क्यू.0247 क्रमांकाची दुसरी एशियाड बस आली. अखेर या बसमधून नंदुरबार ते नाशिक असा प्रवास करीत प्रवाशांना मनस्ताप झाला..सायंकाळी सहा वाजेला निघालेले प्रवासी रात्री एक वाजून दहा मिनिटांनी नंदुरबारला पोहोचले. त्रस्त प्रवाशांनी ग्राहक पंचायत संचलित प्रवासी महासंघाकडे रात्र प्रवासातील नादुरुस्त एसटीबाबत गाऱ्हाणी मांडली आहेत.
विभाग नियंत्रकांनी लक्ष घालावे – प्रवासी महासंघाची मागणी
नंदुरबार आगारातून नाशिक मार्गावर सर्वाधिक बसेस धावतात. यातूनच मोठ्या प्रमाणावर उत्पन्न प्राप्त होत आहे.धुळे विभागात जास्तीचे उत्पन्न देणाऱ्या नंदुरबार आगाराला सुस्थितीतील आणि नव्या बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी धुळे विभागीय नियंत्रक विजय गीते यांच्याकडे
प्रवासी महासंघतर्फे करण्यात आली आहे.-
महादू हिरणवाळे, तालुकाध्यक्ष
ग्राहक पंचायत संचलित, प्रवासी महासंघ, नंदुरबार








