अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा पंचायत समितीत दैनंदिन कामकाज करण्यासाठी तसेच ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्याच्या उद्देशाने तालुक्यातील सरपंचांना बसण्यासाठी पंचायत समितीच्या इमारतीत एक दालन देण्यात आले होते मात्र आता त्या दालनाला कुलुप लावल्यामुळे तालुक्यातील सरपंचांनी इमारतीत असलेल्या खुल्या डोम मध्ये आपले कार्यालय थाटले आहे.
दोन वर्षांपूर्वी अक्कलकुवा पंचायत समितीच्या इमारतीत दैनंदिन कामकाज व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सरपंचांना सभापती दालनाच्या बाजूला असलेले एक दालन देण्यात आले होते त्या दालनात तालुक्यातील सर्व सरपंच एकत्र बसुन आप आपले कामकाज व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत होते.मात्र अचानकपणे सरपंचांना या ठिकाणी बसण्यास मज्जाव करण्यात येऊन दालनातुन सरपंच यांचे टेबल खुर्च्या काढावयास लावण्यात आल्या.
सदर दालन हे सभापतींनी खाली करण्यास सांगण्यात आले म्हणुन नाराज झालेल्या सरपंचांनी आपल्या खुर्च्या टेबल बाहेर काढुन घेऊन अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली मात्र पर्याय न निघाल्याने सरपंचांनी इमारतीतील खुल्या डोम मध्ये आपले कार्यालय थाटले आहे. त्यामुळे अक्कलकुवा पंचायत समितीच्या कार्यालयात येणाऱ्या जनतेला हा उत्सुक्याचा व चर्चेचा विषय ठरला आहे.
गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासुन सुरु असलेल्या सरपंचांच्या दालना बाबत अचानकपणे घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आम्ही सरपंच अचंबित झालो आहोत. तालुक्यात महिला सरपंच देखील असल्याने त्यांना दालनात बसणे सोयीस्कर होते. येथे कोणाच्याही कामात व्यत्यय न आणता सर्वांना सुरळीत असे कामकाज सुरु होते मात्र अचानकपणे दालन खाली करायला लावल्यामुळे आम्ही इमारतीतील खुल्या डोम मध्ये आमचे कार्यालय थाटले आहे. येथेच बसुन महिला व पुरुष सरपंच आम्ही आमचे कामकाज करुन जनतेच्या समस्या सोडविणार आहोत
वसंत हुरजी वसावे
लोक नियुक्त सरपंच पेचरीदेव, तथा अध्यक्ष सरपंच संघटना








