नंदूरबार l प्रतिनिधी
रामपूर, ता. अक्कलकुवा घरकुल घोटाळ्यातील आरोपी यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने 18 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आमदार आमश्या पाडवी यांनी दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, रामपूर, ता. अक्कलकुवा येथे मूळ आदिवासी लाभार्थी यांच्या नावे मंजूर घरकुलचा लाभ हा इतरांच्या बँक खात्यात दिला गेला तसेच अनेक मंजुर पात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळून त्या जागी दुसऱ्या अपात्र व्यक्तींची नावे समाविष्ट केले गेले असल्याचे मी वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. त्यानुसार झालेल्या चौकशी अंती अनेकांवर दोष निश्चिती करण्यात आली परंतु या प्रक्रियेत मुख्य भूमिका असणारे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक, गट विकास अधिकारी तसेच इतर कर्मचारी यांच्यावर मात्र वरदहस्त ठेवत सर्व कारवाईतून त्यांना दूर ठेवण्यात आले.
तसेच मूळ लाभार्थी यांना अद्याप पर्यंत मंजूर घरकुल अनुदानाचा लाभ देण्यात आलेला नाही. सुमारे 3 वर्षाच्या कार्यकाळात लाभा पासून वंचित असलेल्या मूळ लाभार्थी पैकी 4 लाभार्थी यांचा मृत्यू देखील झाला आहे. ही बाब मी ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या देखील निदर्शनास आणून दिली तरी अद्याप कोणतीच ठोस कार्यवाही न होता केवळ कागदी घोडे नचवले जात आहेत. ही बाब अत्यंत निंदाजनक असून या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व अधिकारी/कर्मचारी यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी मृतांच्या परिवाराची तसेच समस्त आदिवासी समाजातून होत आहे. सदर मृतांच्या कुटुंबीयांनी संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे यासाठी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज देखील दिला आहे.
तरी देखील रामपूर ता. अक्कलकुवा येथील घरकुल घोटाळ्यातील सर्व दोषी अधिकारी/कर्मचारी यांच्यावर तथा त्यांच्यावर अद्याप ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत घोटाळ्यास अप्रत्यक्ष समर्थन देणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नंदुरबार यांच्यावर कारवाई झालेली नाही. येत्या 7 दिवसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद न झाल्यास तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा प्रशासनास देण्यात आला होता, तरी देखील अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसुन उलट मयतांच्या वारसांना त्रास देण्याचा प्रकार सुरु असुन, त्यामुळे जनतेचा रोष वाढत आहे.
जनतेचा रोष पाहता वंचित लाभार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी 18 जुलै रोजी अक्कलकुवा तहसिल कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता मयतांचे वारसदार व वंचित लाभार्थी यांच्या समवेत रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे, रस्ता रोको आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या स्वाक्षरीचे याबाबतचे निवेदन लाभार्थ्यांसमवेत अक्कलकुवा तहसीलदार तहसीलदार रामजी राठोड यांना देण्यात आले असून, निवेदनावर पात्र लाभार्थी व तक्रारदार लाभार्थी यांच्या समावेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रामपूर येथील ग्रामस्थ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








