नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
29 जुन 2023 रोजी बकरी ईद व आषाढी एकादशी उत्सवाच्या अनुषंगाने 27 जुन 2023 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथील संवाद हॉल येथे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती.
शांतता समितीच्या बैठकीच्या सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी शांतता समितीचे जेष्ठ सदस्य कांतीलाल टाटीया व मौलाना जकेरीया यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तसेच उपस्थित इतर सदस्यांचा अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी शांतता समितीच्या सदस्यांचे स्वागत केले. नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने दोन्ही सण सौहार्दाचे व शांततेच्या वातावरणात पार पाडण्याचे आवाहन केले.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी बैठकीच्या सुरुवातीला मुस्लिम बांधवांनी स्वत:हून आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेवून एक चांगला पायंडा असून त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे समाजात जातीय सलोख्याचा चांगला संदेश जात असल्याचे सांगितले. दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने समाजकंटकांकडून फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऍ़प इत्यादी समाज माध्यमातून अफवा पसरवून सामाजिक शांतता बिघडवण्याची कृती करणाऱ्या समाज विघातक वृत्तींवर पोलीस दलाचे विशेष लक्ष असून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गैर केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी देखील आपआपल्या स्तरावर अशा वृत्तींना शोधून त्यांच्या हालचालींबद्दल पोलीस विभागास आगाऊ माहिती देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
बैठकी दरम्यान अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय संजय महाजन, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच शांतता समितीचे सदस्य कैलास चौधरी, प्रा. मेहमुद खाटीक, निसार मौलाना, मौलाना जकेरीया, कांतीलाल टाटीया, लक्षमण माळी यांनी आगामी सण / उत्सव व सामाजिक सलोखा राखणेबाबत मनोगते व्यक्त करुन शांतात समितीच्या सदस्यांच्या वतीने काही सूचना / अडचणी यावेळी मांडण्यात आल्या, त्यावर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी त्याचवेळी त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. शांतता समितीच्या या बैठकीत मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवाच्या भावनांचा आदर राखत पुढाकार घेवून संपूर्ण जिल्ह्यात आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी करणार नसल्याचे स्पष्ट केले.
तसेच पोलीसांच्या वेळोवेळी करण्यात येणाऱ्या आवाहनाला मुस्लिम समाजाचा पाठींबा असल्याचे व पोलीस प्रशासनास योग्य ती सर्व मदत करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. सदर बैठकीस नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य कैलास चौधरी, प्रा. मेहमुद खाटीक, निसार मौलाना, मौलाना जकेरीया, कांतीलाल टाटीया, लक्ष्मण माळी यांच्यासह 25 ते 30 सदस्य उपस्थित होते.








