नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील विविध भागात शनिवारी रात्रीच्या सुमारास तब्बल पाच घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सारंगखेडा ता.शहादा येथील श्री. दत्त कॉलनी, शिक्षक कॉलनी येथील पाच घरांची कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, तसेच रोकडसह इतरही मौल्यवान साहित्य चोरले आहे. ही घटना शनिवारी रात्री ते पहाटेच्या समारास घडली आहे. या घरफोडीत भारतसिंग रावल, जितेंद्र राजपूत, सुनिल चित्ते यांच्या घरातील कपाटातून दागिने, रोकड व अन्य वस्तू चोरीला गेल्या आहेत.
इतर घरफोडींमध्ये कुलुप, कोयंडे कापले आहेत. सर्वच घरांची एकाच पध्दतीने कुलूपे कापल्याने ही चोरी एकाच टोळीने केल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी यांनी धाव घेऊन फोडलेल्या घरांचा पंचनामा केला आहे. गावात रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोड्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








