तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील 8 वी ते 12 च्या शाळा सुरू झाल्या आहेत. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने शासनाने शाळा कॉलेज बंद केल्या होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहिले होते. ह्या वर्षी शासनाने शाळा कॉलेज सुरू केल्या असल्या तरी अद्यापपावेतो ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीतच असतांना दिसून येत आहे.
सुरुवातीला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या ठिकाणी येण्यासाठी खाजगी वाहनाने दुप्पट-तिप्पट भाडे देऊन यावे लागत होते. त्यानंतर ग्रामीण बस सेवा सुरू करण्याची मागणी वाढु लागल्याने परिवहन महामंडळाने कशी-बशी बस सेवा सुरू केली. परंतु ती अद्याप पावेतो वेळेवर सुरू नसल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तळोदा ते बोरद बस सकाळच्या वेळी एक दिवस येते तर दोन दिवस येत नसल्याची ओरड पालक व विद्यार्थी यांच्याकडून केली जात आहे. तसेच दुसरीकडे महामंडळाच्या बसेस मध्ये डिझेल नसल्याने वाहणे बंद अवस्थेत आहेत. गाड्यांमध्ये एक दिवस डिझेल असते तर दुसऱ्या दिवशी डिझेल टाकण्यासाठी नंदुरबार येथील आगारात जावे लागत असल्याने महामंडळाचा सुद्धा वेळ व खर्च वाढत चालला आहे. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात नियोजनाचा अभाव दिसुन येत आहे. याचा फटका विद्यार्थी व पालक यांना सहन करावा लागत आहे. आपल्या पाल्यांना खाजगी वाहनाद्वारे शाळेत घेऊन जाण्यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शाळेत वेळेवर पोहचविण्यासाठी मुलांना नाईलाजास्तव ट्रिपल सिट बसवून प्रवास करावा लागत असल्याने अपघात झाल्यास यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदरील विषय प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास मोड येथील ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन छेडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तळोदा-बोरद बस एक दिवस येते तर दोन दिवस येत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मुलांना खाजगी वाहनाद्वारे शाळेत पोहचवावे लागते. त्यामुळे वेळ व पैसा दोघांचा अपवैय होतो. तसेच माझ्या मुलाची पास सुद्धा काढण्यात आली आहे. त्याचा सुद्धा भुर्दंड आम्हा पालकांना सहन करावा लागत आहे.
शासन शिक्षणावर लाखों रुपये खर्च करते, तरी देखील मुलांना वेळेवर शिक्षण उपलब्ध होत नाही. मुलांच्या शिक्षणाबाबत कुणीच गांभीर्याने घेत नाही. शासन व प्रशासन शिक्षणाचा फक्त देखावा करत आहे. आमच्या मुलां वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.दिपक चौधरी, पालक, मोड