नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूक 2021 करीता राजकीय पक्षांसह निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पोटनिवडणुकीबाबत संनियंत्रण समितीच्या आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी कल्पना नीळ-टुबे, अधीक्षक अभियंता (विद्युत) अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता वाय. बी. कुळकर्णी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या, की संपूर्ण निवडणुकीदरम्यान निवडणूक आचारसंहितेचे कटाक्षाने पालन होईल याकडे लक्ष द्यावे. यावेळी त्यांनी पेड न्यूज समिती, सनियंत्रण समिती, शस्त्र जमा करणे आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. निवडणूक विषयी विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी कार्यान्वित करावी. तसेच आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी दिले.
जिल्ह्यातील 11 निवडणूक विभाग आणि 14 निर्वाचक गणासाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यापैकी अक्कलकुवा तालुक्यात 2 निवडणूक विभाग आणि 1 निर्वाचक गण, शहादा 4 विभाग आणि 8 गण तर नंदुरबार तालुक्यात 5 निवडणूक विभाग व 5 निर्वाचक गण आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील 34, शहादा 186 आणि नंदुरबार तालुक्यातील 236 अशा एकूण 456 मतदान केंद्रांवर 2 लाख 82 हजार 387 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यापैकी 1 लाख 39 हजार 548 स्त्री आणि 1 लाख 42 हजार 839 पुरुष मतदार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.