शहादा l प्रतिनिधी
येथील गांधी नगर मधील महसूल विभागातील निवृत्त अव्वल कारकून मोहन जीवन पाटील यांच्या राहत्या घरात पहाटे तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात वीस ते पंचवीस वर्ष वय असलेले चोरट्यांनी घरात घुसून श्री.पाटील यांच्या पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दोन तोळ्यांची मंगल पोत व १५ हजार रुपये रोख रक्कम घेऊन फरार झाले आहेत. या वसाहतीत घरफोडी झाल्याने परिसरात मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहादा येथील गांधी नगर मधील रहिवाशी असलेले महसूल विभागातील निवृत्त अव्वल कारकून मोहन जीवन पाटील व त्यांच्या पत्नी सौ.भारतीबाई मोहन पाटील हे दाम्पत्य पहाटे गाढ झोपेत असताना ३ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराच्या पुढील हॉलमधील खिडकीची जाळी तोडून २० ते २५ वर्षे वय असलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून मोहन पाटील ज्या रूममध्ये झोपले होते त्या रूमची कडी बाहेरून बंद करून सौ. भारतीबाई पाटील यांच्या रूममध्ये शिरत त्यांनी त्या भारतीबाईंच्या डोक्यावर मोठा लोखंडी रॉड घेऊन त्यांना धमकावत तुला येथेच जीवे ठार मारू असे सांगत दुसऱ्या चोरट्याने गोदरेज कपाचे कुलूप तोडून त्यातील सामान अस्ताव्यस्त करून त्यातील काही किमती वस्तू व रोख रक्कम १५ हजार रुपये काढत सौ.भारतीबाई यांच्या गळ्यातील २ तोळ्यांची मंगळपोत ओरबडून नेली, त्यात त्यांना गळ्याला दुखापतही झाली आहे.
चोरट्यांनी मोहन पाटील यांचे दोन नवीन ड्रेस व मोबाईलचे चार्जर असा मुद्देमाल चोरल्यानंतर तेथून पलायन केले. त्यानंतर सौ.भारतीबाई यांनी त्यांच्या घरातून आरडा ओरड केली ते ऐकून आजूबाजूतील रहिवाशांनी तात्काळ श्री पाटील यांच्या घरा जवळ आल्यानंतर घटनेची माहिती घेतली व त्यांनी घटनेची खबर पोलिसांना दिल्यानंतर शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना माहिती मिळाल्यानंतर ते तात्काळ आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आपल्यासह घटनास्थळी दाखल झाले घटनेची माहिती घेऊन त्यांनी परिसरातील पोलीस ठाण्याला खबर देत शहरासह ग्रामीण भागातही नाकाबंदी केली मात्र पोलिसांना या दोन्ही अज्ञात चोरट्यांच्या अद्याप पर्यंत सुगावा लागला नसून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनास्थळी सकाळी नंदुरबार येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर आपल्या ताफ्यासह भेट देऊन त्यांनी पाटील दांपत्यांकडून सदरील घटने संदर्भात संपूर्ण माहिती घेतली. पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांनी पाटील दांपत्याला आश्वासन दिले की तुमच्या मुद्देमालासह चोरट्यांना लवकरच जेर बंद करू. घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते क्षणपतकातील श्वान याने गांधीनगर वसाहतीतून गांधीनगर येथे असलेल्या पालिकेच्या पाणीपुरवठा टाकीजवळ पर्यंत चोरट्यांच्या सुगावा घेतला मात्र तेथून श्वानाला पुढील मार्ग कळू शकला नाही.
भरवस्तीतील ह्या घरफोडी मुळे परिसरात दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटने संदर्भात मोहन पाटील यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत करीत आहे.








