नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांसह जिल्ह्यात ऑक्सिजनची तीन पट व्यवस्था करण्यात यावी , यासह ज्या कोरोना रुग्णांना उपचारासाठी वाढीव बील आकारणी झाली असेल त्या बिलांची पुन्हा लेखा परिक्षण करण्यात येवून त्यांना कोरोना विषयक असलेल्या वैद्यकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत . असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले .
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात नाशिक महसूल विभागातील नाशिक , अहमदनगर , धुळे , जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची आढावा बैठक राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली , त्यावेळी ते बोलत होते . यावेळी विभागीय आयुक्त राधागृष्ण गमे , नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे , धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा , नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री , पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) सचिन पाटील , नाशिक जि . प . च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड , अहमदनगर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर , धुळे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी, अपर जिल्हाधिकारी जळगाव प्रवीण महाजन , उपायुक्त ( नियोजन ) प्रशांत पोतदार , उपायुक्त ( महसूल ) गोरक्ष गाडीलकर आणि जिल्ह्याचे नियोजन अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते .
श्री . क्षीरसागर पुढे म्हणाले की , कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे . त्यानुषंगाने बालकांसाठी आयसीयु ब्रेड , व्हेंटीलेटर , ऑक्सिजन व इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या . जिल्हा वार्षिक योजना व नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करतांना प्रथम प्राधान्य कोविड विषयक बाबींना देण्याबरोबरच जनतेच्या हिताच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे . तसेच कायमस्वरुपी मालमत्ता तयार होऊन त्याचा फायदा अनेक वर्ष होईल अशा स्वरुपाची विकास कामे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून घेण्यात यावी , अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली . नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात . तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येची वाढ रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी , असेही श्री.क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले .