नंदुरबार l प्रतिनिधी
वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ झाली असून कमाल तापमान येत्या काही दिवसात ४२ ते ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी हवामान केंद्रातर्फे देण्यात आली.दरम्यान आज ४३.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नंदूरबार जिल्हयात आज ४३.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी सांगितले की, भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातून उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. तापमानात अचानक वाढ झाल्याचे दिसून येत असून पुढील काही दिवस तापमान जास्त राहील.
कमाल तापमानात वाढ होऊन पारा ४२ ते ४५ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमानात अचानक वाढ झाल्याने उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तापमानात वाढ होत असल्याने शेतकरी बंधूंनी उन्हाळी भुईमूग,बाजरी, मूग, तीळ इत्यादी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. पाणी देण्यासाठी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडावी. जेणेकरून पिकांना उष्म्याचा ताण बसणार नाही आणि जमिनीचे तापमान नियंत्रित राहील.
फळ झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा ज्यामुळे मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्तवेळ टिकून राहील. फळधारणा अवस्थेत असलेल्या आंबा, केळी व पपईसारख्या फळांचे उन्हापासून बचाव करण्यासाठी पिशवीने फळे झाकून घ्यावीत. वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता जनावरांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे किंवा पोते पाण्याने भिजवून शरीरावर बांधावे त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. दरम्यान, लोकांनी पुढील काही दिवस विशेषतः दुपारी १२ ते ४ या काळात थेट उन्हात जाणे टाळावे, शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवून मुबलक प्रमाणात कालांतराने पाणी प्यावे, अशी माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी दिली आहे.