नंदूरबार l प्रतिनिधी
हिरकणी फाउंडेशन, नंदुरबारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नटखट प्ले स्कुल, कोकणी हिल नंदुरबार येथे रक्तदान शिबीर, रांगोळी स्पर्धा व प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.गणेश पाटील तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून चंद्रशेखर चौधरी हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालय येथील डॉ.सोनाली कुलकर्णी, डॉ.मोनिका वसावे, डॉ.रमा वाडीकर तसेच हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.चेतना गोस्वामी, उपाध्यक्षा सौ.प्रियंका पटेल, सौ.संगिता वाघ, सौ.उज्वला गावीत, सौ.आरती पाटील, सौ.कल्पना पाटील, सौ.निता मराठे तसेच देवेंद्र कासार, राहुल शिंदे, प्रणव पवार, हर्षल मिस्तरी आदी उपस्थित होते. यावेळी खुशी पानपाटील, खुशी सोनवणे तसेच मयुरी पवार या विद्यार्थीनींनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रा.गणेश पाटील यांनी म.फुले व डॉ.आंबेडकर यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले. व आजच्या रक्तदान शिबीरातून दोन्ही महामानवांना श्रध्दांजली दिली जात आहे, असे सांगितले.
रांगोळी स्पर्धेत एकुण १६ महिलांनी व मुलींनी सहभाग घेतला. यात चेतना प्रविण माळी (प्रथम), माधवी भिमराव कापुरे (द्वितीय) तर रुपाली अमोल पिंपळे (तृतीय) यांनी यश संपादन केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली. यानंतर झालेल्या रक्तदान शिबीरात ७ ते ८ महिलांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवारंग फाउंडेशनचे जितेंद्र लुळे यांनी केले. तर प्रास्तविक चेतना गोस्वामी यांनी मांडले. आभार संगिता वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हिरकणी फाउंडेशन, युवारंग फाउंडेशन व जिल्हा रुग्णालयाचा स्टाफ यांनी सहकार्य केले.