शहादा l प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समिती शहादाच्या संचालक मंडळ निवडीसाठी कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही गटाची कार्यकर्त्यांसह विचार विनिमय करण्यासाठी परिसराचे नेते दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.रविवारी सरदार पटेल सभागृहात झालेल्या बैठकीस तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती शहादाच्या संचालक मंडळ निवडणुकी निमित्ताने रविवार दि. 26 रोजी झालेल्या बैठकीस परिसराचे नेते, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, शहादा-तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी, शहादा पंचायत समितीचे माजी सभापती माधवकाका पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, युवा नेते मयूर दीपक पाटील यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी बैठकीस प्रमुख उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी, आदिवासी सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, व्यापारी, हमाल-मापारी, विविध संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा संचालक मंडळ निवडणूक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध व्हावी असा सूर उपस्थित सदस्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. आ. राजेश पाडवी यांनी तसेच दीपक पाटील यांनी मार्गदर्शन केले.तत्पूर्वी प्रकाशचंद्र जैन,अनिल भामरे आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी संचालक किशोर मोरे यांनी केले. आभार माजी उपसभापती रवींद्र रावल यांनी व्यक्त केले.








