नंदूरबार l प्रतिनिधी
मध्य प्रदेश राज्यातील सीहोर येथे आयोजीत करण्यात आलेल्या शिवमहाकथापुराण महोत्सवाला प्रचंड गर्दी झाली असून रुद्राक्ष महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. रुद्राक्ष घेण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाल्याने मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील एका महिलेचा मृत्यू झाला. तर बुलढाणा जिल्ह्यातील 3 महिला बेपत्ता झाल्या आहे. सीहोरला जाणार्या भाविकांनी नियोजन करुनच घराबाहेर पडावे असे आवाहन मध्य प्रदेश प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सिहोर येथे जवळपास 20 लाख लोक जमल्याचा अंदाज आहे. भाविकांची मोठी गर्दी पाहून पंडित प्रदीप मिश्रा यांनी बुधवारी रुद्राक्षांचे वितरण सुरु केले होते. समितीने 20 काउंटर्सच्या मदतीने भाविकांना रुद्राक्ष वाटले. बुधवारी सायंकाळपर्यंत जवळपास दीड लाख रुद्राक्षांचे वाटप झाले.
आज गुरुवार रोजी रुद्राक्ष घेण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाल्याने मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील मंगलाबाई कांडेकर यांचे निधन झाले.तर बुलढाण्याच्या एका महिलेसह 3 महिला भाविक बेपत्ता झाल्या आहेत.
प्रचंड गर्दी झाल्याने अनेकांना रुद्राक्ष न मिळाल्याने लोकांनी पंडित प्रदीप मिश्रांविरोधात नाराजी व्यक्त करत घोषणा दिल्या.
दरम्यान या महोत्सवाला मध्य प्रदेश व महाराष्ट्रासह, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, गुजरात आदी देशाच्या विविध राज्यातून भाविक येत आहेत. बुधवारी कुबेरेश्वर धाम महादेवाच्या दर्शनासाठी 2 किमी लांब रांग लागली होती.गुरुवारी सकाळची कुबेरेश्वर धाम ते इछावर रोडपर्यंत 17 किमी लांबीचा जाम होता. सीहोर ते इंदूरच्या दिशेने 27 किमी व भोपाळच्या दिशेने 10 किमी लांबीच्या महामार्गावरही जाम होता.
गर्दीमुळे मोबाईल नेटवर्कवरही ताण आला होता. पोलिस व प्रशासनाच्या टीम व्यतिरिक्त आरएसएस, बजरंग दल, स्थानिक लोक, समिती सदस्य असे एकूण 15,000 लोक व्यवस्था सांभाळत आहेत. कथा पंडाल, अन्न पंडाल, रुद्राक्ष वितरण केंद्र येथे त्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.








