नंदुरबार | प्रतिनिधी
नर्मदा जीवन शाळांमधून विद्यार्थ्यांना आदिवासी बोलीभाषेतून शिक्षण दिले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना हे शिक्षण आपले वाटते. यातून गळती थांबायला मदत झाली असून विकासाच्या प्रक्रियेत शिक्षण कसे महत्वाचे ठरते हे जीवन शाळांनी अधोरेखित केल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केले. काथर्दे दिगर येथे आयोजित जीवन शाळांच्या बालमेळाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.
शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथे जीवन शाळांच्या चार दिवसीय बालमेळाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवित दर्जेदार कलाविष्कार सादर केले. काल चौथ्या दिवशी समारोप करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी, वाल्मीचे डायरेक्टर जनरल श्री.भिंगारे, शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, चेतन साळवे, लतिका राजपूत यांच्यासह विजया चव्हाण, शिरीष पिंगळे, तेजस पवार, शरद कांबळे, शाम पाटील, डॉ.रशीद पटेल, ताराबाई मराठे, तात्याची पवार, गुरमीत गांधी, जयसिंगराव शिंदे, प्रकाश भामरे, डॉ.सुहास कोल्हेकर यांच्यासह चिमलखेडी उपसरपंच नुरजी वसावे, डनेल येथील कालूसिंग पाडवी तसेच हिरालाल पावरा, पुन्याभाई वसावे,
सिताराम पावरा, दिलीप पावरा, निमाताई पटले आदी उपस्थित होते. चार दिवसाच्या बालमेळाचा समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी दर्जेदार नृत्य सादर केले. याप्रसंगी हेरंब कुलकर्णी पुढे म्हणाले, सद्यस्थितीत सर्व शिक्षा अभियान, शिक्षण हक्क कायदा, नवीन शैक्षणिक धोरण असे प्रयत्न करुनही गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थी संख्या टिकविण्यात त्याचा परिणाम होत नाही. यामुळे याची कारणीमिमांसा करण्याची गरज आहे. गेल्या ३० वर्षापासून जीवन शाळांनी आदिवासी शिक्षण, बुडीत क्षेत्रातील शिक्षण आणि शेकडो तरुणांच्या आयुष्याला वळण दिले असल्याचे श्री.कुलकर्णी म्हणाले. बालमेळात उत्कृष्ठ कलाविष्कार सादर करणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.








