नंदुरबार l प्रतिनिधी
‘हौसेला मोल नसते’ अशी म्हण आहे. कोण कशाची हौस करेल याचं सांगता येत नाही. अशीच एक हौस नवरदेवाच्या पित्याने केली असून, हा नंदुरबार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.लग्न लागण्यापूर्वी नवरदेव पित्याने आपला वर मुलगा व वधू सूनबाई यांना शहरातून हेलिकॉप्टरने सफर घडवली.
नंदुरबार शहरातील राजपूत समाजाध्यक्ष मोहिनीराज राजपूत यांचा मुलगा हंसराज याच्या याचा विवाह सोहळा जैनाबाद ता.जि बऱ्हाणपूर (म.प्र) येथील विजयसिंग राजपूत यांची कन्या रितिका हिच्याशी मंगळवारी गोरज मुहूर्तावर पार पडला. तत्पूर्वी नवरदेव पिता मोहिनीराज राजपूत यांनी हौसे खातर नवरदेव मुलगा हंसराज व नववधू सुनबाई रितिका हिला शहरातून हेलिकॉप्टरने सफर घडवून आणली.
८ वर्षानंतर मुलगा झाल्याने वाटली होती हत्तीवरून साखर
नवरदेव पिता मोहिनीराज राजपूत यांना लग्नानंतर तब्बल ३८ वर्षानंतर पुत्ररत्न प्राप्त झाला. पुत्ररत्नाच्या आनंदाने त्यावेळी त्यांनी श्रीक्षेत्र शेगावहून हत्ती मागवला होता आणि त्या हत्तीवरून नंदुरबारात नातेवाईक, मित्र मंडळ व आप्तेष्टांना साखर वाटप केल्याचे नवरदेव पिता मोहिनिराज राजपूत सांगतात.
अन् मनात आला हेलिकॉप्टरच्या विचार
नवरदेव पिता मोहिनीराज राजपूत यांना ३८ वर्षानंतर पुत्ररत्न प्राप्त झाला होता.त्याच वेळी त्यांनी मुलाचा लग्न सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्याचे ठरवले होते. मोहिनीराज राजपूत यांनी अनेक लग्न समारंभांना हजेरी लावली. अनेक लग्न समारंभामध्ये भव्य दिव्य आरास, स्टेज, शाही विवाह त्यांनी पाहिले. परंतु,या पेक्षाही मुलगा हंसराज याच्या विवाह अनेकांच्या स्मरणात राहील असे करून दाखवण्याचा निर्धार केला. अन् मुलाचं लग्न लागण्यापूर्वी नवदांपत्यास शहरातून हेलिकॉप्टरची सफर घडवून आणण्याच्या चंग बांधला त्यानुसार,मंगळवारी गोरज मुहूर्तावर लग्न लागण्याच्यापूर्वी दुपारी हेलिकॉप्टर मधून नवदांपत्यास सफर घडवून आणली.








