नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत मोबाईल व्हॅनचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सदर वाहन 13 ते 17 फेब्रुवारी या पाच दिवसामध्ये जिल्हयातील एकुण 19 कृषि मंडळामध्ये प्रत्येकी एक दिवस या प्रमाणे प्रचार प्रसिध्दी करणार आहेत.
आत्म निर्भर भारत पॅकेज अंतर्गत संपुर्ण देशभर सुरु असलेल्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची जिल्हयामध्ये संथ गतीने प्रगती सुरु असल्याने योजनेस व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिध्दी देण्यासाठी चार मोबाईल व्हॅन पुणे येथुन पुरविण्यात आलेले आहे. प्रकल्प मंजुरीची संख्या कमी असणारे तसेच आकांक्षीत जिल्हे म्हणजेच नंदुरबार, बीड, हिंगोली व परभणी या चार जिल्हयामध्ये मोबाईल व्हॅन व्दारे प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
मे. अँगल, ऍडव्हटायझिंग पुणे या संस्थेस प्रचार व प्रसिध्दी करणे साठी जवाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हयासाठी एकुण चार मोबाईल व्हॅन पुणे येथुन पाठविण्यात आले असून त्यामध्ये एकुण 30 मिनीटाची चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. या मध्ये लाभार्थी पात्रता निकष तसेच जिल्हयामध्ये वाव असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती देण्यात आली आहे. या शिवाय घडी पुस्तीकेचे वाटप ही करण्यात येणार आहेत. सदर मोबाईल वाहने दि. 13 ते 17 फेब्रुवारी या पाच दिवसामध्ये जिल्हयातील एकुण 19 कृषि मंडळामध्ये प्रत्येकी एक दिवस या प्रमाणे प्रचार प्रसिध्दी करणार आहेत.
सदर प्रचार प्रसिध्दी साठी प्रत्येक मंडळात जास्तीत जास्त जनसंपर्क असणारे स्थळे जसे बँका, शासकीय कार्यालय, बस स्थानके, रेल्वे स्टेशन या सारखे स्टॉप पॉईंट नेमुन देण्यात आलेले आहेत. सदर योजना नंदुरबार सारख्या कृषि पुरक जिल्हयास मुल्यवाढ व रोजगार निर्मितीसाठी अत्यंत चांगली योजना असून जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीमती मनिषा खत्री, जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी केले आहे. या प्रसंगी जिल्हा नोडल अधिकारी विजय मोहिते, तालुका कृषी अधिकारी स्वप्नील शेळके, जिल्हा संसाधन व्यक्ती विशाल घरटे, कृषि सहाय्यक उत्सव पाटील व कृषि सहाय्यक अक्षय वसावे आदी उपस्थित होते.








