नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खाई ते कोठली रस्त्यावर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने २२ वर्षीय तरुण जखमी झाला.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील कंकाळामाळ खाई येथील भरत विजय वसावे व त्याचे पाहुणे वनसिंग वसावे हे दोघेजण दुचाकीने (क्र.जी.जे. ३९ एई ६५७८) खाई ते कोठली रस्त्याने जात होते. यावेळी एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.जी.जे. १९ एम ३७९८) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून अक्कलकुवा गावाजवळ दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात वनसिंग वसावे यांना दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत भरत वसावे यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.धनराज जाधव करीत आहेत.








